सातारा : मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी बुधवारी साताऱ्यातील आंदोलनात झालेल्या दगडफेकीत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह ३२ पोलीस जखमी झाले. तर सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अडीच हजार संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी साताऱ्यात बंद पुकारण्यात आला होता. त्यानंतर मराठा समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर दुपारी महामार्गावर टायर जाळून रास्तारोको करण्यात आला.
पोलिसांनी जमावाला हटकण्याचा प्रयत्न केला असता जमावाने महामार्गाचे दुभाजक उखडले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यात पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपअधीक्षक गजानन राजमाने यांच्यासह ३२ पोलीस जखमी झाले.
तसेच पोलिसांच्या वाहनांची, खासगी वाहनांची आणि बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील दुकानांची तोडफोड करण्यात आली. यात सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अडीच हजार जणांवर गुन्हा दाखल केला. त्यापैकी ८२ जणांना अटक करण्यात आली आहे.