सातारा : साताऱ्यात आज, सोमवारी सकल मराठा क्रांती महामोर्चा निघणार आहे. महामोर्चाची तयारी पूर्ण झाली असून, परजिल्ह्यातील पोलिसांची कुमकही मागविण्यात आली आहे. दरम्यान, वातावरण निर्मितीसाठी रविवारी शहरातून वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी रॅली काढण्यात आली. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी मिळावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर मराठा क्रांती मोर्चा निघत आहेत. या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील महामोर्चाला ऐतिहासिक महत्त्व असल्याने आजवरचे सर्व विक्रम मोडण्यासाठी संयोजकांनी निर्धार केला आहे. त्या अनुषंगाने तयारी झाली असून, सातारा शहरातील चौकाचौकांमध्ये भगव्या पताका आणि महाकाय फ्लेक्स लावले आहेत. शहरात सोमवारी पहाटेपासूनच मराठा समाजबांधव महामोर्चाला येणार असल्याने त्यांना मोर्चाचा मार्ग लक्षात यावा, यासाठी पोलिसांनी रस्त्यावर ठिकठिकाणी फलक लावले आहेत व वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी शाहू क्रीडा संकुलमध्ये पोलिसांची बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना केल्या. (प्रतिनिधी) हजारो बांधव साताऱ्यात पुणे, मुंबईसह कोल्हापूरमध्ये शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झालेले; पण मूळचे साताऱ्याचे असलेले हजारो समाजबांधव रविवारीच साताऱ्यात दाखल झाले आहेत. साताऱ्यातील पाहुण्यांकडे ते मुक्कामी थांबले असून, शहरातील हॉटेल्स, लॉज फुल्ल झाले आहेत.
साताऱ्यात आज मराठा महामोर्चा
By admin | Published: October 03, 2016 12:14 AM