कऱ्हाड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी केलेल्या आंदोलनातील अनेक मुलांवर गुन्हे दाखल करण्यात आले. प्रत्येक गोष्टीत मराठा समाजातील लोकांचे खच्चीकरण केले जाते. आरक्षण नसल्यामुळे समाजातील मुलांना उच्च शिक्षणही घेता येत नाही. मुलांवर गुन्हे दाखल झाली. अनेकजणांचा मृत्यू झाला तरी मुख्यमंत्र्यांना जाग कशी येत नाही. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणप्रश्नी लवकर तोडगा काढावा, अन्यथा ‘वर्षा’ बंगल्यात घुसू,’ असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या मराठा समाजातील महिलांनी दिला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बुधवारी कऱ्हाड येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मराठा समाजातील महिलांच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
दरम्यान, खोनोली, ता. पाटण येथील रोहन तोडकर यासह मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांना आदरांजली वाहण्यात आली. मराठा समाजाने आत्तापर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलने केली. मात्र, शासन याची दाद घ्यायला तयार नाही. त्यामुळे मराठा समाजातील महिलांनी आता बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी,’ अशा घोषणा देण्यात आल्या.