Manoj Jarange Patil ( Marathi News ) : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या शांतता रॅलीच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर सध्या जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज त्यांची सातारा इथं सभा पार पडली. मात्र या सभेत भाषण सुरू असताना अचानक जरांगे पाटील यांना भोवळ आली आणि ते खाली बसले. त्यानंतर जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना आधार देत बाजूला नेलं.
सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करा, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मागील महिन्यात उपोषण केलं होतं. मात्र या उपोषणानंतरही शासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने शक्तिप्रदर्शन करत आंदोलन आणखी मजबूत करण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्यव्यापी दौऱ्याचं आयोजन केलं आहे. कोल्हापूर इथं पार पडलेल्या शांतता रॅलीनंतर ते आज साताऱ्यात पोहोचले होते. इथं मराठा बांधवांना संबोधित करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यानंतर काही वेळाने जरांगे यांना भोवळही आली.
भाषणाच्या सुरुवातीपासूनच मनोज जरांगे यांना कंबरदुखीचा त्रास सुरू होता. त्यामुळे त्यांनी कंबरेला पट्टाही लावला होता. मात्र नंतर भोवळ आल्याने त्यांना आपलं भाषण थांबवावं लागलं.
सरकारला पुन्हा इशारा
मनोज जरांगे यांनी आज साताऱ्यातील शांतता रॅलीतून पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. "मला आणि माझ्या समाजाला राजकारण करायचं नाही. पण तुम्ही आरक्षण देणारच नसाल तर आम्हाला राजकारणात आल्याशिवाय पर्याय नाही. आरक्षण न दिल्यास आम्ही पुन्हा तुमचे उमेदवार पाडणार," असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
दरम्यान, "समाजातील तरुणांनी आत्महत्या करू नये. फार फार तर काय होईल? तुमचा नंबर यावर्षी लागण्याऐवजी पुढच्या वर्षी लागेल. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा, पण चुकीचं पाऊल उचलू नका. आरक्षण मिळवायचं असेल तर प्रत्येकाने घराबाहेर पडण्याची तयारी ठेवा. तुम्ही आता घराबाहेर पडला नाही तर तुमच्या पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत," असंही मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना उद्देशून म्हटलं आहे.