सातारा - ‘मराठा समाजावर वर्षानुवर्षे अन्याय होत आहे. गुणवत्ता असूनही अनेक मुले-मुली त्यांच्या भविष्याबाबत चिंतेत आहेत. या परिस्थितीमध्ये इतरांना ज्या पद्धतीने आरक्षण आहे, त्या पद्धतीने मराठा समाजाला देखील नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण द्यावे, ही रास्त मागणी आम्ही करत आहोत. या समाजाचे नेतृत्व कोणी करावे, यापेक्षा त्यांचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे, तो सुटणे महत्त्वाचे आहे,’ असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. शिवाजी महाराज स्मारक कृती व समन्वय समितीचे अध्यक्ष शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी शनिवारी सातारा येथे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन दि. ३ आॅक्टोबर रोजी पुणे येथे होणा-या मराठा समाजाच्या विचार मंथन बैठकीसाठी आमंत्रण दिले. या आमंत्रणाचा स्वीकार दोघांनीही केला, तसेच या बैठकीला उपस्थित राहण्याचे आश्वासन देखील दिले.
जलमंदिर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, ‘ज्या मराठा समाजाने राज्यासाठी, देशासाठी मोठे योगदान दिले. त्या समाजातील पुढची पिढी सध्या हतबल अवस्थेत आहे. गुणवत्ता असूनही शिक्षण आणि नोकरीमध्ये योग्य ती संधी मिळत नसल्याने या समाजातील मुले-मुली चिंताग्रस्त आहेत. इतर समाजाचे आरक्षण काढून मराठा समाजाला द्या, असे आम्ही म्हणत नाही तर इतर समाजाला ज्या पद्धतीने आरक्षण आहे, त्याच पद्धतीने मराठा समाजही अत्यंत दयनीय अवस्थेत जीवन जगत आहे. त्यांनादेखील आरक्षणाचा लाभ देऊन त्यांच्या भविष्याची चिंता मिटवावी, अशी आमची मागणी आहे. पुण्यात होणा-या बैठकीत याबाबत सविस्तर विचार मंथन होईल, मी या बैठकीला जाणार आहे. मराठा समाजाचे नेतृत्व कोणी करावे, यापेक्षा समाजाचा प्रश्न गांभीर्याने सुटणे महत्त्वाचे आहे.’सुरुची येथे आमदार विनायक मेटे यांनी आमदार शिवेंद्र्रसिंहराजे भोसले यांना निमंत्रण दिले. तेव्हा शिवेंद्र्रसिंहराजे म्हणाले, ‘मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मिटणे आवश्यक आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण लवकर द्यावे. राज्य शासनाने मराठा समाजाची मागणी भक्कमपणे मांडली पाहिजे. ३ आॅक्टोबर रोजी होणाºया समाजाच्या बैठकीत आंदोलनाची नेमकी दिशा ठरेल. सर्वांनी संघटितपणे हा प्रश्न हाताळायला हवा. सरकारवर दबाव आणण्यासाठी जो काही निर्णय होईल, त्या पद्धतीने पुढची वाटचाल करू. सर्वांना एकत्रित आणण्यासाठी आमदार विनायक मेटे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे नेतृत्व कोणी करायचे वगैरे या प्रश्नाला दुय्यम महत्त्व आहे आणि समाजातील कोणीही त्याला फाटे फोडत बसू नये.’