लोणंद (सातारा) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. यामध्ये लोणंद ग्रामस्थांनी आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत बंद न पाळण्याचा निर्णय घेतला होता. परंतु संतप्त झालेल्या इतर गावांतील समाजबांधव लोणंदमध्ये दाखल झाले. त्यावेळी ठरल्याप्रमाणे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी ( 10 ऑगस्ट) लोणंद बंद पाळला. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला.
हजारो मराठा समाज बांधव सकाळी साडेदहा वाजता अहिल्यादेवी चौकात एकत्र आले होते. आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच पुश्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चाला सुरुवात झाली. ‘एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे,’ अशा घोषणा देत हा मोर्चा स्टेशन चौक, शास्त्री चौक, शिवाजी चौक मार्गे गेला.
बाजारतळ येथे सुमारे अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला. बंदमुळे लोणंद बसस्थानक परिसरात शुकशुकाट होता. शहरातील रस्ते ओस पडल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते. मोर्चाला वाहतुकीचा अडथळा ठरू नये म्हणून अहिल्यादेवी चौकातून वाहतूक वळविण्यात आली होती. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांच्या नेतृत्त्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.