सातारा : ‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवर रस्ता अडवून जाळपोळ व घोषणाबाजी करून जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर, वाठार व औंध पोलीस ठाण्यात २४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनेमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांतिदिनी राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश जारी केला होता. तरी गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पिंपोडे बुद्रुक ते सोळशी रस्त्यावर नांदवळ एसटी बस स्थानकासमोर काही युवक बेकायदा जमा झाले. त्यातील विश्वजित विनोद पवार, अफसर हबीब शेख, ओंकार रवींद्र पवार, संग्राम दिलीप पवार, भूषण अरुण पवार, सौरभ प्रमोद पवार (सर्वजण रा. नांदवळ, ता. कोरेगाव) यांनी रस्ता अडवून टायर पेटवून दिले. याबाबत वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पुसेगाव-कराड रस्त्यावर राजाचे कुर्ले येथे वैभव संभाजी माने, तानाजी संभाजी माने, राहुल बाळकृष्ण यादव, संभाजी शंकर कदम व इतर तीन ते चार जणांनी (सर्वजण रा. राजाचे कुर्ले, ता. खटाव) रस्ता अडवून दुचाकीचे टायर जाळले. याप्रकरणी औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बॉम्बे रेस्टॉरंट ते पोवई नाका रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी सहा वाजता दारूच्या बाटल्या बाळगून आरडाओरडा केल्याप्रकरणी हृषिकेश चंद्रकांत लाड (रा. शाहू चौक), गणेश साळवी, अभिजित ऊर्फ भैया अभिजित साबळे व इतर चार ते पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.