दहिवडी : ‘प्रत्येक जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चा निघत आहेत. शेवटचा मोर्चा मुंबईत आहे. त्यावेळी प्रत्येकाने एकेरी तिकीट काढून यावे. मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मुंबई न सोडण्याचा निर्धार मराठ्यांनी करावा,’ असे आवाहन स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांनी केले.दहिवडी येथे मराठा क्रांती महामोर्चाच्या निमित्ताने मंगळवारी जाहीर मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी छावा संघटनेचे नानासाहेब जावळे-पाटील, इतिहास तज्ज्ञ इंद्रजित सावंत, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, स्वाभिमानीचे कोल्हापूर अध्यक्ष सचिन तोडकर, जिल्हाध्यक्ष युवराज मगर-पाटील, उपसभापती अतुल जाधव, मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील उपस्थित होते. राणे म्हणाले, ‘आरक्षणाबद्दल संपूर्ण महराष्ट्रात फिरतो आहे. एक महिन्यापासून मराठ्यांना जागृत करण्याचे काम करत आहे. आरोपींना फाशी होत नाही, तोपर्यंत आपण कोपर्डीला जाणार नाही. ‘चर्चा करण्याची तयारी आहे,’ असे मुख्यमंत्री आज म्हणतात. चर्चा कसली करता. मागण्या समोर आहेत, निर्णय घेणार असाल तर चर्चेला बसा, अन्यथा हा मोर्चा सरकारची खुर्ची हलविण्यास कमी करणार नाही. मुख्यमंत्री फक्त हे करू, ते करू म्हणतात. म्हणून मी त्यांना ‘गोडबोले’ असे म्हणतो. अॅट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा, अशी आमची अजिबात मागणी नसून त्यात बदल व्हावा, अशी आमची मागणी आहे.’ वसंतराव मुळीक म्हणाले, ‘आमच्या मुलांना नव्वद टक्के गुण मिळूनही आरक्षण मिळत नाही. नोकऱ्या मिळत नाहीत. ७० टक्के शेतकरी मराठा असून, त्यांची शेती धरण, तलाव, प्रकल्प, कालवे यामध्ये गेली आहे. काही गुंठे राहिली आहे. सहा कोटी मराठे असूनही आरक्षणासाठी झगडावे लागत आहे. नारायण राणे यांनी १८ लाख कुटुंबांचा सर्व्हे करून १६ टक्के आरक्षणाची मागणी केली; पण सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही.’यावेळी इंद्रजित सावंत, नानासाहेब जावळे यांची भाषणे झाली. अतुल जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
मराठ्यांनो.. आरक्षण मिळेपर्यंत मुंबई न सोडण्याचा निर्धार करा
By admin | Published: September 28, 2016 12:05 AM