कोपर्डे हवेली : पारंपरिक शेतीला फाटा देऊन अनेक शेतकरी आधुनिक शेतीकडे वळले आहेत. अंतर्गत पीक घेऊन अनेक शेतकरी दुहेरी नफा मिळवत आहेत. असाच प्रयोग नडशी, ता. कऱ्हाड येथील शेतकरी गणेश नलवडे यांनी केला असून आल्याच्या शेतीत त्यांनी फुलाची बाग फुलवली आहे. फुलाला दर चांगला मिळत असून उत्पादन खर्च वजा जाता त्यांना पाच लाख रुपयांचा नफा मिळण्याची अपेक्षा आहे.
नडशीतील गणेश नलवडे यांनी गतवर्षी मे महिन्यात साडेचार फुट सरी सोडून अडीच एकरांवर आल्याची लागवड केली. मात्र, आल्याला दर समाधानकारक नसल्याने आले न काढता जमिनीत तसेच ठेवले. फेब्रुवारी महिन्यात अडीच एकरांवर दहा हजार झेंडूच्या फुलांच्या रोपांची लागवड सरीवर केली. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा उपयोग केला. अधूनमधून कीड नियंत्रण फवारणी केली. फुलांच्या दोन रंगांच्या जाती निवडल्या. त्यामध्ये अष्टगंध पिवळा आणि ओमीनो एलो आदींचा सामावेश आहे. सध्या फुलांचे तोडे सुरू असून मंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवली जातात. किलोला चाळीस ते पन्नास रुपये मिळतात. दर असाच राहिला तर अजून दोन महिने फुलांचे तोडे सुरू राहणार असून सुमारे पाच लाख रुपये मिळतील, असा अंदाज गणेश नलवडे यांनी व्यक्त केला आहे. झेंडूच्या लागवडीसाठी केवळ पन्नास हजार रुपये उत्पादन खर्च आला आहे, तर अडीच एकरांत सत्तर टन आले मिळेल, असा अंदाज आहे. सध्याच्या दरानुसार त्यांना चौदा लाख रुपये मिळतील. मात्र, दर समाधानकारक नसल्याने ते आले त्यांनी जमिनीतच ठेवले आहे. वर फुले आणि खाली आले, असा दुहेरी फायदा नलवडे यांनी मिळवला आहे.
- कोट
अडीच एकर क्षेत्रावर आल्याचे पीक घेतले. दर नसल्यामुळे ते तसेच ठेवले. गत दोन महिन्यांपूर्वी झेंडूची लागवड केली. आल्याला दिलेली खते फुलांना लागू झाली. त्यामुळे उत्पादन खर्च कमी झाला. शेतीची मशागत आणि इतर खर्च वाचला. फुलांपा दर चांगला मिळत असून उत्पादन चांगले निघत आहे.
- गणेश नलवडे
शेतकरी, नडशी, ता. कऱ्हाड
- चौकट
अंतर्गत पिके ठरतात फायद्याची
मुख्य पिकात अंतर्गत पीक घेतल्यास एकाचे नुकसान झाले तर दुसऱ्या पिकामुळे ते नुकसान भरून निघते. याशिवाय खतांच्या खर्चासह मेहनतीचा खर्च वाचतो. दिवसांची बचत होते. त्यामुळे अंतर्गत पीक फायद्याचे ठरू लागले आहे.
फोटो : १०केआरडी०१
कॅप्शन : नडशी, ता. कऱ्हाड येथील शेतकरी गणेश नलवडे यांनी आल्याच्या शेतीत झेंडूची बाग फुलवली आहे.