कऱ्हाड : बाजार समितीच्या आखाड्यात पुन्हा एकदा जुन्या मुरब्बी पैलवानानेच बाजी मारली. गोळेश्वरचे पैलवान शिवाजीराव जाधव सभापती झाले, तर खराडेच्या आत्माराम जाधवांना उपसभापतिपदाची लॉटरी लागली. पण या निवडी वर्षभरासाठीच असून दरवर्षी नव्या लोकांना संधी देण्याचे ठरल्याची चर्चा उंडाळकर समर्थकांमध्ये आहे. सहा वर्षांपूर्वी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने हिसकावून घेतलेली बाजार समिती माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकरांनी पुन्हा ताब्यात घेतली. त्यासाठी भाजपचे युवा नेते डॉ. अतुल भोसले, उत्तरचे युवा नेते धैर्यशील कदम, मनोज घोरपडे आदींची त्यांना साथ लाभली. बाजार समितीतील सत्तांतरासाठी ‘उत्तर’ मतदारसंघानेही मोठा हातभार लावला. त्यामुळे सभापतिपदाची संधी कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्याला मिळणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागू राहिले होते. दुसऱ्यांदा निवडून आलेल्या उत्तरेतील हिंदुराव चव्हाण यांच्या नावाची चर्चाही सुरू होती. निवडीमध्ये जुन्या-नव्यांचा अन् दक्षिण उत्तरचा मेळ उंडाळकरांनी घातल्याचे दिसतेय; पण सोमवारी प्रमुख नेते अन् संचालक मंडळातील सदस्यांची मते जाणून घेतल्यानंतर अनेकजण इच्छुक असल्याचे नेत्यांच्या लक्षात आले अन् वर्षाला नवे कारभारी देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते; पण हे निश्चित झाल्यावरही पहिलं कोण, हा विषय समोर आला अन् गोळेश्वरच्या पैलवानांनी ‘पहिला माझा नंबर’ म्हणत बाजी मारली. त्यामुळे सभापतिपदाच्या रेसमध्ये असणाऱ्यांनी उपाध्यक्षपदाला नकार दिल्याने खराडेच्या जाधवांना अनपेक्षितपणे उपाध्यक्षपदाची लॉटरी लागली. सभापती, उपसभापतिपदी दोघेही ‘जाधव’ असले तरी उत्तर दक्षिणचा सत्तेचा समतोल राखण्यात आला आहे. उत्तर अन् दक्षिण विधानसभा मतदार संघात प्रत्येकी एक पद देऊन विलासराव पाटील-उंडाळकरांनी दोन्ही मतदार संघांवर आपली पकड बसविण्याचा प्रयत्न ठेवला आहे. दक्षिणेत भोसले गटाच्या मदतीने तर उत्तरेतील समर्थकांचे मनोधैर्य वाढेल, अशी खेळी करीत ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आमदार बाळासाहेब पाटील यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे निवडणुकीत पराभूत झालेल्या आघाडीला आता आत्मचिंतन करावे लागणार, हे निश्चित आहे. (प्रतिनिधी) बाजार समितीच्या सभापती, उपसभापतिपदी दरवर्षी नवीन पदाधिकारी निवडण्याचा निर्णय झाल्याने आता १८ पैकी सुमारे १० जणांना संधी मिळणार आहे. यापूर्वी एक अध्यक्ष पाच वर्षे कार्यकाल पूर्ण करीत होता; पण आता इच्छुकांची संख्या वाढल्याने नेत्यांनाही सबुरीने घ्यावे लागत आहे.जिल्हा परिषद अन् पंचायत समिती डोळ्यासमोर...जिल्हा मध्यवर्ती बँक, कृष्णा साखर कारखाना व शेती उत्पन्न बाजार समिती या तीन निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक मारलेल्या उंडाळकरांची आता चौकार मारण्याची तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उंडाळकर गट चाल खेळत आहे. आजच्या निवडी हा त्याचाच भाग असून भविष्यातील निवडीही त्यांच्या अभ्यासानेच असतील, असे कार्यकर्ते बोलत आहेत. सोमवारीच निर्णय मंगळवारी शिक्कामोर्तबखरंतर सभापती, उपसभापतिपदी दोन जाधवांची निवड करण्याचा निर्णय सोमवारी रात्रीच उंडाळकरांच्या घरी झालेल्या बैठकीत झाला होता. त्यामुळे मंगळवारी सकाळी फक्त त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले एवढेच.
बाजार समितीत पैलवानाची बाजी!
By admin | Published: September 24, 2015 10:18 PM