सातारा : जिल्ह्यातील आठ बाजारसमित्यांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. राष्ट्रवादी-काँगे्रस या दोन पक्षांचे प्रभुत्व असणाऱ्या या बाजार समित्यांत शिरकाव करण्यासाठी शिवसेना काय भूमिका घेणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शिवसेनेने आपले पॅनेल उभे केले होते. बाजार समित्यांच्या रणातही सेनेला ताकद दाखविण्याची संधी आहे. भाजपही बाजार समित्यांमध्ये चंचूप्रवेश करण्यासाठी इच्छुक आहे.पाटण, दहिवडी वगळता आठ बाजार समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक, खरेदी-विक्री संघांच्या निवडणुकीनंतर बाजार समित्यांवर वर्चस्व राखण्यासाठी राष्ट्रवादीने व्यूव्हरचना आखली आहे. लोकसभा, विधानसभा, साखर कारखाने, विकास सेवा सोसायट्या, पतसंस्था, नागरी पतपेढ्या, बँका, गृहनिर्माण संस्था या सहकारी संस्थांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. सध्या जिल्ह्यामध्ये कृष्णा कारखाना, प्राथमिक शिक्षक बँक यांची रणधुमाळी सुरू आहे. जिल्ह्यामध्ये कऱ्हाड, सातारा, जावळी, वाई, खंडाळा, फलटण, खटाव, कोरेगाव या शेती उत्पन्न बाजार समित्यांची दि. ३० मे २०१५ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिध्द झाली आहे. तर १० जून रोजी पाटण व दहिवडी बाजार समित्यांची अंतिम मतदारयादी प्रसिध्द झाली आहे. त्यामुळे राजकीय धुरिणांना उत्सुकता लागून राहिली होती. आतापर्यंत झालेल्या निवडणुकांत अनेकांना संधी नाकारण्यात आली होती. मुळात जिल्हा बँकेत नाही तर नेत्यांनी आपल्याला बाजार समित्यांत तरी संधी द्यावी, अशी काही जणांची इच्छा आहे. जिल्ह्यातील सर्व शेती उत्पन्न बाजार समित्यांची सार्वत्रिक निवडणूक महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियमानुसार होत आहेत. ही निवडणूक तीन टप्प्यांत घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पहिल्या टप्प्यात दि. २२ जून रोजी सातारा, जावळी, वाई व कोरेगाव या शेती बाजार समित्यांचा समावेश आहे. २५ जून रोजी सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात फलटण, खटाव या तालुक्यांचा तर तिसऱ्या टप्प्यात २९ जून रोजी कऱ्हाड, खंडाळा या बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. या निवडणुका शेतकऱ्यांशी निगडीत असल्याने गावागावांत गप्पांना पुन्हा ऊत आला आहे. जिल्ह्यातल्या सर्वच सार्वत्रिक निवडणुका लढण्याची घोषणा भाजप व शिवसेनावाले वारंवार करत आहेत. दोन्ही पक्षांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेपूट घातले. आता बाजार समित्यांच्या निवडणुकांत काय भूमिका राहणार?, याची उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)पाटण, दहिवडीत जुलैमध्ये धूमशान...पाटण, दहिवडी बाजार समित्यांची अंतिम मतदार यादी १० जून रोजी प्रसिद्ध झाली आहे. या दोन्ही तालुक्यांत जुलै महिन्यात धूमशान होणार आहे.राष्ट्रवादी, काँगे्रस या पक्षांनी जागोजागी पॅनेलची जुळवाजुळव सुरु केली आहे. बाजार समित्यांवर वर्चस्व ठेवण्यासाठी दोन्ही पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. शिवसेना-भाजपनेही चाचपणी सुरु केली आहे. पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढणार असल्याचेही संकेत मिळत आहेत.
बाजार समित्यांच्या सारिपाटावर डाव मांडला!
By admin | Published: June 18, 2015 10:06 PM