सातारा : केंद्र शासनाने बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणूका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील बाजार समित्या सोमवारी बंद होत्या. यामुळे सुमारे एक कोटींची उलाढाल थांबली.जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, वाई, फलटण या बाजार समितीत दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. पण, सोमवारच्या एक दिवसाच्या बंदमुळे बाजार समितीत शेतमाल आला नाही. सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता. व्यापाऱ्यांचे गाळे बंद होते. फक्त बाजार समिती आवारात कांद्यासारखा शेतमाल ठेवलेला दिसत होता.
बंदमुळे शेतकरीही बाजार समितीकडे फिरकले नाहीत. सातारा बाजार समितीची सुमारे ५० लाख रुपयांची उलाढाल थांबली. तर ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच लोणंदलाही कांद्याची आवक थांबली.