सागर गुजर ल्ल सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, काँगे्रस, भाजप या पक्षांमध्ये अपक्षांना पुरस्कृत करून घेण्यासाठी मोठी दंगल सुरू झाली आहे. काही जागी अधिकृत उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने त्या ठिकाणी निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांना आपल्याकडे ओढण्यासाठी या पक्षांची चढाओढ सुरू झाली आहे. ज्या मैदानात दोन काँगे्रस लढल्या, त्याच मैदानात भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारिप बहुजन महासंघ, राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षांनी ललकारी दिली असल्याने भलतीच रंगत वाढली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अनेकांनी स्वत:च्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. १९२ जागांसाठी २ हजार २२ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेसाठी ६४ गण व १२८ गणांसाठी उमेदवार निश्चित केले आहेत. कऱ्हाड तालुक्यात त्यांची काँगे्रसशी बोलणी सुरू आहेत. राष्ट्रवादीने प्रत्येक तालुकाध्यक्षांना आघाडी करण्यासंदर्भातले अधिकार दिले असल्याने कऱ्हाडात राष्ट्रवादी-काँगे्रसची मैत्री होण्याची शक्यता आहे. भाजपने ५९ गट व ११० गणांसाठी उमेदवार निश्चित केले आहेत. बाकी ठिकाणी अपक्षांशी बोलणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांच्याशी काही ठिकाणी भाजपने युती केली आहे. मात्र, या उमेदवारांना भाजपच्या चिन्हावर लढावे लागणार आहे. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या पत्नी हेमलता गायकवाड या यशवंतनगर गणातून निवडणूक लढत आहेत. त्यांना भाजपचा एबी फॉर्म मिळाला असल्याने त्या भाजप चिन्हावरच निवडणूक लढणार आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील गटात भाजप उमेदवाराच्या शोधात आहे. शिवसेना ५८ गट ११६ गणांत स्वत:च्या चिन्हावर निवडणूक लढणार आहे. जिथे उमेदवार मिळाले नाहीत, तिथे अपक्षांना पुरस्कृत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. १३ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. साहजिकच या दिवशी दुपारी ३ नंतर निवडणुकीचे निश्चित चित्र स्पष्ट होणार आहे. स्वाभिमानी, भारिप यांच्यासह आता रासपही रिंगणात..स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारिप व रासपतर्फेही ठराविक ठिकाणी उमेदवार दिले गेले आहेत. फलटण, माण, खटाव, सातारा, कऱ्हाड या तालुक्यांत आघाडी करून निवडणूक लढण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. रासप भाजपसोबत असून, फलटण तालुक्यात ३ गटांत लढणार आहे. तर भारिप बहुजन महासंघ साताऱ्यात ४ पंचायत समिती व २ जिल्हा परिषद गटात लढणार आहे. कऱ्हाडात ३ जागी, मेढ्यात एका जागी अशा एकूण १० ठिकाणी भारिपने आपले उमेदवार दिले आहेत.
‘पुरस्कृत’साठी अपक्षांचं मार्केट जोरात..!
By admin | Published: February 08, 2017 10:52 PM