आॅनलाइन लोकमत
क-हाड (सातारा), दि.04 - भावाच्या मोबाईलला मेसेज करून विवाहित बहिणीने दगडाच्या खाणीत उडी घेत आत्महत्या केली. सुर्ली, ता. क-हाड येथील घाटात सोमवारी दुपारी घडलेली ही घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. स्नेहल गणेश सोलापुरे (वय २७, रा. पुसेसावळी, ता. खटाव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क-हाडातील शनिवार पेठेत राहणा-या गाढवे कुटुंबातील स्नेहलचा सुमारे तीन वर्षांपूर्वी पुसेसावळी येथील युवकाशी विवाह झाला. संबंधित युवक अभियंता असून, तो पुण्यात नोकरीस आहे. स्नेहलला एक लहान मुलगा आहे. गत काही दिवसांपासून स्नेहल माहेरी क-हाड येथे राहण्यास आली होती. ‘सासरच्यांकडून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्यामुळे ती क-हाडात राहत होती,’ असे माहेरच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. क-हाडात राहत असताना स्नेहल तणावाखाली असल्याचे कुटुंबीयांना जाणवले. त्यामुळे तिची मानसिकता बदलण्यासाठी कुटुंबीय तिला आजोळी नेर्ली, ता. कडेगाव येथे पाठवत होते. नेर्ली येथे स्नेहलची आजी वास्तव्यास आहे. सुमारे आठ दिवसांपूर्वीही स्नेहल व तिचा मुलगा नेर्ली येथेच राहण्यास गेले होते. सोमवारी दुपारी कडेगाव येथून बाळाची औषधे घेऊन येते, असे आजीला सांगून स्नेहल घरातून बाहेर पडली. त्यानंतर काही वेळाने तिने भाऊ ऋषिकेश याच्या मोबाईलवर मेसेज पाठवला. ‘मी सुर्ली येथे आहे,’ असे त्या मेसेजमध्ये लिहिले होते. काही वेळानंतर ऋषिकेशला स्नेहलचा दुसरा मेसेज आला. ‘तू माझ्या मुलाला अधूनमधून भेटायला येत जा,’ असा मजकूर त्यामध्ये होता. ऋषिकेशला संशय आल्यामुळे त्याने स्नेहलच्या मोबाईलला फोन केला. मात्र, तिचा फोन बंद होता. त्यामुळे ऋषिकेशसह इतर नातेवाईक तातडीने सुर्ली येथे गेले. तसेच पुढे कडेगाव व नेर्लीतही स्नेहलचा शोध घेण्यात आला. मात्र, ती सापडली नाही. याबाबत नातेवाइकांनी कडेगाव पोलिसात मिसिंगची फिर्याद दाखल केली. सोमवारपासून पोलिस व नातेवाईक बेपत्ता स्नेहलला शोधत होते.
दरम्यान, सुर्ली घाटातील एका दगडाच्या खाणीत युवतीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच गाढवे कुटुंबीयांना त्याठिकाणी बोलवले. त्यावेळी संबंधित मृतदेह स्नेहलचा असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह रात्री उशिरा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. त्याठिकाणी नातेवाइकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सासरच्या जाचास कंटाळून स्नेहलने आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या नातेवाइकांनी केला आहे.