नागठाणे: पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरतगाववाडी गावच्या हद्दीत दुचाकीला मालट्रकने धडक दिल्यानंतर ट्रकच्या चाकाखाली सापडून विवाहितेचा जागीच मृत्यू झाला तर एक युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास झाला. सारिका तानाजी मोहिते (वय ३२, रा.नागठाणे ता.सातारा) असे अपघातात ठार झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर वैभव विलास सकटे (वय १९, रा.अंगापूर, ता.सातारा) असे जखमी युवकाचे नाव आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वैभव सकटे हा शेंद्रे येथून आपली आत्या सारिका मोहिते हिला दुचाकीवरून (क्र.एमएच ११ डीसी ४१५२) नागठाणे येथे सोडण्यासाठी निघाला होता. भरतगाववाडी गावच्या हद्दीत राजमार्ग हॉटेलचे पुढे ते आले. याचवेळी एका शिवशाही बसला चुकीच्या बाजूने मालट्रक चालकाने ओव्हरटेक केले. ट्रक भरधाव वेगात होता. ओव्हरटेक करतच ट्रकने पुढे निघालेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यावेळी दुचाकीवर बसलेली सारिका मोहिते ही महामार्गावर खाली पडली. त्यानंतर मालट्रकच्या चाकाखाली सापडल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचालक वैभव हाही खाली पडल्यामुळे तो ही गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर अज्ञात मालट्रक चालकाने तेथे न थांबता मालट्रकसह तेथून पलायन केले.
या अपघाताची माहिती मिळताच हायवे बीट चारचे सचिन पोळ, पी.सी.शिंदे, बी.आर.नदाफ, बोरगाव पोलीस ठाण्याचे किरण निकम, उत्तम गायकवाड, राहुल भोये, कपिल टीकोळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी युवकास उपचारासाठी नागठाणेतील आरोग्य केंद्रात दाखल केले. याबाबतची तक्रार वैभव सकटे याने बोरगाव पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक डॉ.सागर वाघ हे करत आहेत.