सातारा: एका बावीस वर्षीय विवाहितेवर अत्याचार केल्याच्या आरोपावरुन दोन सख्या भावंडांवर दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेला मुलाला जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी अनेकवेळा अत्याचार केल्याचे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
२०१९ मध्ये पीडित विवाहितेचा २१ वर्षीय युवक वारंवार पाठलाग करत होता. फोनवरून माझे तुझ्यावर प्रेम आहे, तु मला आवडतेस, असं तो पीडित विवाहितेला म्हणायचा. त्यावेळी पीडितेने माझे लग्न झाले असून, मला एक मुलगाही आहे. तु मला परत फोन करू नको, असे सांगितले. मात्र, तो नेहमी फोन करू लागला. त्यामुळे विवाहितेने त्याचा फोन ब्लॉक केला. दरम्यान २०१९ मध्ये पीडित महिला शेतात जात असताना संबंधित २१ वर्षाच्या युवकाने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. यानंतरही तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, अशी धमकी देत त्याने वारंवार अत्याचार केला.
दरम्यान, या युवकाचा २० वर्षाचा धाकटा भाऊ सुद्धा पीडितेला वारंवार फोन करत होता. मी तुझ्यावर प्रेम करणार म्हणजे करणार. तु जरी नाही म्हणालीस तरी मी तुझ्यावर प्रेम करणार असे तो फोनवर पीडितेला बोलत होता. मुलाला मारून टाकण्याची धमकी देऊन पीडितेला तो फोन करण्यास भाग पाडत होता. ५ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री दहा वाजता पीडितेच्या घराच्या पाठीमागील पडक्या घरात या धाकट्या भावानेही अत्याचार केल्याचे पीडित विवाहितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दोघा सख्या भावांच्या या कृत्याने माण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेची दहिवडी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख हे अधिक तपास करत आहेत.