कुडाळ : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ येथील शहीद जवान प्रथमेश संजय पवार (वय २२) हे अनंतात विलीन झाले. आज, सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास बामणोली तर्फ कुडाळ येथील दत्त मंदिरानजीक मोकळ्या पटांगणावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘अमर रहे... अमर रहे... शहीद जवान प्रथमेश पवार अमर रहे,’ अशा घोषणा देऊन गावकऱ्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी गावकऱ्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.शहीद जवान प्रथमेश पवार यांना त्यांचा लहान भाऊ आदित्य पवार यांनी साश्रूनयनांनी मुखाग्नी दिला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबीय, मित्र परिवारासह, तालुका, जिल्हाभरातून नागरिक बामणोलीत आलेले होते. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.बामणोलीसह आजूबाजूच्या परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. पुणे येथून त्यांचे पार्थिव सकाळी ७ वाजता पाचवड, ता. वाई येथे आणण्यात आले. येथून फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीतून शहीद जवान प्रथमेश यांचे पार्थिव घेऊन निघालेली शोभायात्रा सरताळे, कुडाळ, शेते, सोमर्डी मार्गे, बामणोली तर्फ कुडाळ, डेरेवाडी येथे पोहोचली.आईने केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा
त्यांच्या घरी पार्थिव पोहोचताच शहीद जवान प्रथमेश यांच्या आईने केलेला आक्रोश उपस्थितांचे मने हेलावून टाकणारा होता. परिसरातील गावचे आबालवृद्ध शहीद जवान प्रथमेश यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रस्त्यावर उभे होते. या अंत्ययात्रेत देशभक्तीपर गीतांबरोबरच ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘अमर रहे... अमर रहे... शहीद जवान प्रथमेश पवार अमर रहे,’ अशा घोषणा देऊन त्यांना गावकऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली.तीन महिन्यांपूर्वीच लष्करात दाखलसीमा सुरक्षा दलात ते जम्मू येथे कार्यरत होते. अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत त्यांना गोळी लागली होती. यामध्ये ते जखमी झाले होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रशिक्षण संपवून केवळ तीन महिन्यांपूर्वीच ते जम्मू येथे लष्करात दाखल झाले होते.