लोकमत न्यूज नेटवर्कमेढा : ‘अमर रहे अमर रहे.. शहीद रवींद्र धनावडे अमर रहे’च्या घोषणा, वीरमाता, वीरपत्नीचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश... छोट्या वेदांत व श्रद्धा यांची केविलवाणी अवस्था, अशा गंभीर वातावरणात शहीद रवींद्र धनावडे यांना हजारोंच्या उपस्थितीत साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला.जावळीच्या या लढवय्या मावळ्याला अखेरचा निरोप देताना जावळीची कडीकपारीही गहिवरली. तर डोंगरदºया नि:शब्द झाल्या. बंदुकीच्या तीन फैरी झाडून लष्करी इतमामात शहीद रवींद्र धनावडे यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा वेण्णा नदीच्या तीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी ‘सीआरपीएफ’चे आयजी राजकुमार, पोलीस उपमहानिरीक्षक विनोद विजय, कमांडंट देव शंकर मिश्रा, व्हाईस कमांडंट सचिन गायकवाड यांच्यासह ‘सीआरपीएफ’च्या जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून शहीद रवींद्र धनावडे यांना सलामी दिली.यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, तहसीलदार रोहिणी आखाडे, माजी आमदार सदाशिव सपकाळ आदींनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली....अन् वेदांत कावरा-बावराशहीद रवींद्र धनावडे यांचा वेदांत हा अवघ्या नऊ वर्षांचा मुलगा अतिशय कावºया-बावºया अवस्थेत घरातून फिरत होता. आपल्या बाबांचे काय झाले, हे त्याला कळतच नव्हते. आई मेघा व आजी जनताबाई यांच्या आक्रोशामुळे वेदांतच्या कावºया-बावºया नजरेने उपस्थितांचे हुंदके वाढतच होते.यापूर्वीही दोन गोळ्या अंगाला घासून गेल्या होत्या!मोहाट गावातील अमोल जाधव हे देखील २००९ मध्ये सीआरपीएफमध्ये दाखल झाले आहेत. ते गावी सुटीवर आले आहेत. शहीद रवींद्र धनावडे यांच्याविषयी बोलताना भावना अनावर झाल्या. त्यांची एक आठवण सांगताना अमोल जाधव म्हणाले, ‘शहीद रवींद्र हे यापूर्वी श्रीनगरमध्ये कार्यरत होते. त्यावेळी असाच प्रसंग आला होता. त्यावेळी दहशतवाद्यांच्या दोन गोळ्या रवींद्र यांच्या अंगाला घासून गेल्या होत्या. दैव बलवत्तर म्हणून ते यातून बचावले होते. रवींद्र यांच्या नशिबी वीरमरणच होेते, असे म्हणत त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.ग्रामस्थांना अश्रू अनावर!शहीद रवींद्र धनावडे यांचे पार्थिव मोहाट गावात येताच ग्रामस्थांनी शनिवारपासून एकवटून धरलेला धीर सुटला अन् सारे गाव अश्रूंच्या हुंदक्यांनी सुन्न झाले. घरातील सुवासिनींनी शहीद रवींद्र यांच्या पार्थिवाला ओवाळून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. शहीद रवींद्र यांच्या घराजवळ त्यांचे पार्थिव येताच वीरमाता जनताबाई, पत्नी मेघा, मुले श्रद्धा व वेदांत यांच्या आक्रोशाने सारा परिसर गहिवरून गेला.जिल्हाधिकाºयांना अश्रू अनावरशहीद रवींद्र धनावडे यांच्या घरी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व जावळीच्या तहसीलदार रोहिणी आखाडे या सकाळी दहाच्या सुमारास कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आल्या. यावेळी वीरमाता व वीरपत्नी यांनी केलेला आक्रोश पाहून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल आणि तहसीलदार रोहिणी आखाडे यांना अश्रू अनावर झाले. अन् त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. जिल्हाधिकारी सिंघल यांना शब्दच फुटले नाहीत. त्या स्तब्ध होत्या.मी परत येईन का नाही!शहीद धनावडे हे गावी आल्यानंतर जाताना नेहमी मी परत येईल की नाही, हे माहीत नाही, असे म्हणायचे. मात्र, आई व पत्नी नेहमी म्हणायच्या, असे बोलत जाऊ नकोस; पण त्यांचे बोलणेच दुर्दैवाने खरे ठरले.गणेशोत्सवाचे सर्व कार्यक्रम रद्द१ रवींद्र धनावडे हे शहीद झाल्याची बातमी मोहाट गावात धडकताच जावळी तालुका शोकसागरात बुडाला. अनेक ठिकाणी गणेशोत्सवाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. मोहाट या ८०० लोकसंख्या असलेल्या गावात चूल पेटली नाही. शहीद धनावडे यांच्या आठवणींनी अनेकांना गहिवरून येत होते. मोहाट गावाकडे रविवारी सकाळपासूनच नागरिकांची रीघ लागली होती. मेढा बाजारपेठही बंद ठेवण्यात आली.२ मेढा शहरासह तालुक्यात सर्वच गावांत ‘शहीद रवींद्र धनावडे अमर रहे’चे फलक लावण्यात आले होते. तसेच मोहाट गावातही फलक लावण्यात आले होते. मात्र, पुणे-सातारा मार्गावर अपघात झाल्याने त्यांचे पार्थिव सासवड-लोणंद, वाठार स्टेशन-पाचवड मार्गे सायंकाळी सव्वासात वाजता मेढा येथे आणण्यात आले. यावेळी जावळी पंचायत समितीसमोर वेण्णा हायस्कूलच्या एनसीसी कॅडेटनी शहीद रवींद्र धनावडे यांना मानवंदना दिली. शहीद रवींद्र धनावडे हे वेण्णा हायस्कूलचे विद्यार्थी होते.पदोन्नतीवर श्रीनगर येथे बदली!रवींद्र धनावडे यांची २००० मध्ये ‘सीआरपीएफ’मध्ये पहिल्याच फेरीत निवड झाली. मुंबई, श्रीनगर, गडचिरोली व पुन्हा श्रीनगर असा त्यांच्या नोकरीचा प्रवास झाला. फेब्रुवारीला मुंबई येथून गडचिरोली येथे बदली झाली. व त्यानंतर काही महिन्यांतच हवालदार या पदावर त्यांची पदोन्नती झाली होती. त्यानंतर ते श्रीनगर येथे रुजू झाले होते. दरम्यान, शहीद रवींद्र धनावडे हे मे महिन्यामध्ये गावी सुटीवर आले होते. १४ जूनला सुटी संपल्यानंतर ते पुन्हा कामावर हजर झाले होते.
शहीद धनावडे अनंतात विलीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 11:23 PM