म्हसवड : माण तालुक्यात जलसंधारणाचे काम मोठे झाले असून, त्याचे दृश्य परिणामही दिसत आहेत. अशाचप्रकारे माणदेशी फाउंडेशनच्या वतीने म्हसवड हद्दीतील मासाळवाडीमध्ये उभारलेला बंधारा आताच्या अवकाळी पावसाने भरल्याने कायम दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या वाडीत पाणी दिसू लागले आहे. यामुळे मासाळवाडी पाणीदार होण्यास मदत झाली असून, शेतकºयांतही आनंदाचे वातावरण आहे.म्हसवड परिसरात पाऊस झाला तरी मासाळवाडी हद्दीत पाऊस नसायचा, हे नेहमीचेच ठरलेले. असे अनेकवेळा झाले आहे. तर कधी पाऊस झाला तरी ते वाहून जायचे. नंतर पाण्याचा ठणठणात पाहावयास मिळायचा. भौगोलिक परिस्थिती काहीशी विचित्र असल्याने याठिकाणी कायम पाण्याचे दुर्भिक्ष दिसून येते. या ठिकाणी म्हसवड नगरपालिकेच्या वतीने पिण्याच्या पाण्यासाठी नळपाणी पुरवठा योजना राबवली असली तरी तेथे कायमच पाण्याची कमतरता भासते. अशा परिस्थितीत येथील जनावरांच्या पाण्याचा मोठा प्रश्न नागरिकांना सतावत असतो. या ठिकाणी खरेतर एक तलाव आहे. मात्र, तो तलाव सततच कोरडा ठणठणीत राहिल्याने त्याचा येथील नागरिकांना कधी लाभ सहसा होत नाही, त्यामुळे मासाळवाडीचे चित्र नेहमीच दुष्काळी असे राहिले आहे.मासाळवाडीतील ही बाब फार गंभीर असल्याने नगरसेवक डॉ. वसंत मासाळ यांनी याबाबत माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांना याबाबतची माहिती देऊन पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी सिमेंट बंधारा बांधण्याची विनंती केली. त्यावेळी माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा यांनी हा प्रश्न नक्की सोडवला जाईल, अशी ग्वाही डॉ. मासाळ यांना दिली. त्यानंतर गतवर्षी चेतना सिन्हा व विजय सिन्हा या दाम्पत्याने मासाळवाडीत जाऊन पाहणी केली. कोठे बंधारा उभारता येतोय का, साईड उपलब्ध आहे का ? याची माहिती घेत बंधारा उभारण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर माणदेशी फाउंडेशन व क्रेडिट सुईस यांच्या आर्थिक साह्याने मासाळवाडी येथे स्वतंत्र बंधारा उभारला. आज या बंधाºयात अवकाळी झालेल्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचल्याने मासाळवाडीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या पाण्यामुळे येथील जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटला. नागरिकांनी समाधान व्यक्त करीत फाउंडेशनच्या प्रमुख चेतना सिन्हा व माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा यांचे आभार मानले.
अवकाळी पावसाने भरला मासाळवाडीचा बंधारा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:56 PM