सातारा : रुग्णालयातून बाहेर पडणारा कोरोनाबाधितांचा जैविक कचरा व नागरिकांकडून वापरल्या जाणाऱ्या मास्कची पालिकेकडून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे. दैनंदिन कचऱ्यात जमा होणारे मास्क व इतर कचऱ्याचे पालिकेकडून वर्गीकरण केले जाते. यानंतर जैविक कचरा जाळण्यासाठी नेचर अँड नीड संस्थेच्या प्रकल्पात पाठविला जातो.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नागरिक गेल्या वर्षभरापासून मास्कचा नियमित वापर करू लागले आहेत. प्रारंभी बहुतांश नागरिक यूज अँड थ्रो मास्क वापरत होते. मात्र, मास्कची गरज सातत्याने भासू लागल्याने अशा मास्कऐवजी आता कापडी मास्क वापरण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे पूर्वी कचऱ्यात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या मास्कचे प्रमाण आता कमी झाले आहे. प्रशासनाने नियुक्त केलेल्या नेचर ॲन्ड नीड या खासगी संस्थेकडून जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांचा जैविक कचरा संकलित केला जातो. पालिकेच्या सोनगाव डेपोजवळ या संस्थेने जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पात शास्त्रीय पद्धतीने कोरोनाबाधितांचा तसेच रुग्णालयांतील दैनंदिन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते.
गृहविलगीकरणातील कोरोनाबाधितांचा कचरा सध्या सोनगाव डेपोतच पडत आहे. मात्र, या कचऱ्याचे पालिकेकडून वर्गीकरण केले जाते. ओल्या कचऱ्याची खड्ड्यात विल्हेवाट लावली जाते तर प्लास्टिक कचरा, मास्क, सॅनिटायझरच्या रिकाम्या बाटल्या, औषध आदी कचरा वेगळा करून तो नेचर अँड नीडच्या प्रकल्पात जाळण्यासाठी पाठविला जातो. हा कचरा हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेची सर्व साधने पालिकेकडून पुरविली जातात.
(पॉइंटर)
शहरातून दररोज निघणारा कचरा ४८ टन
ओला कचरा ४४ टन
सुका कचरा ४ टन
रुग्णालयातील जैविक कचरा ८ टन
(चौकट)
रुग्णालयातील कचरा थेट प्रकल्पात
जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी रुग्णालय, लेबोरेटरीज, रक्तपेढ्या या ठिकाणी साचणारा जैविक कचरा नेचर ॲन्ड नीड संस्थेकडून संकलित केला जातो. कोरोनामुळे सध्या जैविक कचऱ्यात वाढ झाली असून, दररोज सुमारे आठ ते दहा टन जैविक कचरा जिल्ह्यातून संकलित केला जातो. संस्थेच्या साताऱ्यातील जैविक प्रकल्पात या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते.
(चौकट)
पालिकेकडून कचऱ्याचे वर्गीकरण
सातारा पालिकेकडून कोरोनाबाधितांचा कचरा घंटागाडीतच संकलित केला जातो. हा कचरा डेपोत आल्यानंतर त्याचे वर्गीकरण केले जाते. सद्यस्थितीत सर्व कचरा घंटागाडीतच पडत आहे. परंतु, कोरोना बाधितांचा कचरा संकलित करण्यासाठी पालिकेकडून स्वतंत्र घंटागाडीची व्यवस्था केली जाणार आहे.
(कोट)
यूज अँड थ्रो मास्क केवळ रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात. नागरिकांकडून आता कापडी मास्कचा वापर वाढला आहे. असे मास्क धुता येतात व पुन्हा वापरता येऊ शकतात. त्यामुळे कचऱ्यात पडणाऱ्या मास्कचे प्रमाण आता कमी झाले आहे. पालिका जैविक कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावते.
- अनिता घोरपडे, आरोग्य सभापती
(डमी न्यूज)