सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. जिल्हाबंदी लागू केली. मात्र, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीने प्रवास करता येतो. तरीही, सातारा मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. पुण्याकडे एखादी एसटी निघाली की, वाहकाजवळ जाऊन ‘मास्तर नातेवाईक वारलेत, सोडता का?’ अशी विनवणी केली जात आहे.
राज्यात कोरोनाचा शिरकाव गेल्या वर्षी मार्चमध्ये झाला होता. तेव्हा कडकडीत लॉकडाऊन पाळला गेला होता. सर्वच सेवा बंद असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या तब्बल सात महिने एकाच ठिकाणी उभ्या होत्या.
कोरोनाची दुसरी लाट पुन्हा आली आहे. यामध्ये रुग्णसंख्या दररोज हजाराेंच्या संख्येने वाढत असून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही तेवढीच आहे. रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळत नाहीत, त्यामुळे नाइलाजाने राज्य सरकारला लॉकडाऊन जाहीर करावा लागला. सर्व कार्यक्रम, यात्रा, जत्रा रद्द केल्या आहेत. लग्न, अंत्यविधीतील उपस्थितीवर निर्बंध लादले आहेत.
कोरोनाला रोखण्यासाठी काही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी जीवाची बाजी लावून अहोरात्र झटत आहेत. त्यांना स्वत:च्या घरून कामाच्या ठिकाणी जाता यावे म्हणून केवळ अशाच कर्मचाऱ्यांसाठी एसटीने प्रवास करण्यास सवलत दिली आहे. त्यामुळे एसटीच्या फेऱ्याही कमी झाल्या आहेत. तरीही, सातारा मध्यवर्ती बसस्थानकात प्रवासी दिसत आहेत. मात्र, वाहकांना काही सूचना असल्याने ओळखपत्र पाहूनच एसटीत प्रवेश दिला जातो. त्यामुळे वाहकाला एकट्यात गाठून, ‘साहेब... अमुक गावात नातेवाईक वारलेत, प्लीज मला सोडताल का?’ अशी विचारणा केली जात आहे. एखाद्याला खरेच अडचण किंवा कारण वाटले तर काही वाहक त्यांना घेऊनही जातात. पण, शक्यतो नकारच ऐकावा लागत असल्याने कित्येक तास बसस्थानकात ताटकळत थांबावे लागते.
चौकट
११
जिल्ह्यातील एकूण आगार
८१
फेऱ्या चालविल्या जातात
९००
सरासरी प्रवास करणाऱ्यांची संख्या
चौकट
प्रत्येकाला वेगवेगळी कारणे
* वाहकाचे वय पाहून काही जण कारणे ठरवत असतात. यामध्ये प्रामुख्याने जवळच्या नातेवाइकांचा मृत्यू झाला आहे.
* घरातील जवळच्या व्यक्तीचे लग्न आहेे.
* पुण्याला नोकरीसाठी बोलावले आहे. कालच फोन करून या म्हणून सांगितले आहे.
* मित्र किंवा नातेवाईक रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यासाठी इंजेक्शन मिळत नाही, त्यासाठी पुण्याला जायचंय.
चौकट
एसटी कर्मचाऱ्यांसोबत वाद
शासनाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटी सुरू ठेवली आहे. याबाबत चालक-वाहकांना सूचनाही तशा केल्या आहेत. जर गाडी रस्त्यात पकडली गेली तर तपासणीत अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती नसल्याचे लक्षात आल्यावर वाहकावर कारवाई होण्याचा धोका असतो. त्यामुळे वाहक घेण्यास नकार देतात. तेव्हा काही तरुण मात्र अरेरावीवर येऊन वादावादी करत असतात.
उभी चौकट
पुणे, कोल्हापूरसह ग्रामीण भागात गर्दी
सातारा मध्यवर्ती बसस्थानकातून सध्या सर्वाधिक पुण्याच्या दिशेला प्रवास करणाऱ्यांची मोठी गर्दी असते. त्या पाठोपाठ कोल्हापूर, फलटणला आहे. ग्रामीण भागातून भाज्या घेऊन काही शेतकरी मिळेल त्या वाहनाने साताऱ्यात येतात. मात्र, गावाकडे परत जाण्यासाठी एसटीची वाट पाहत थांबलेले असतात.
कोट ;
एसटीतून अत्यावश्यक सेवेतील व्यक्तिंसाठीच सलवत असली तरी ई-पास काढलेला असल्यास प्रवास करण्यास परवानगी दिली जाते. तसेच एसटीला आवश्यक तेवढे प्रवासी मिळाले तर गाडीही सोडली जाते.
- रेश्मा गाडेकर,
आगार व्यवस्थापक, सातारा.