काही गावांचा नावलौकिक जगभर पसरलेला असतो. मात्र, काहीजण आपल्या वर्तनाने या नावाला गालबोट लावतात. असाच एक प्रकार सध्या येथे घडत आहे. राज्य शासनाने राज्यात गुटखा आणि मटक्यावर बंदी घातली आहे. अवैध मद्य विक्रीलाही बंदी घातली आहे. मात्र, बंदी असलेले व्यवसाय नफा कमवून देतात, हे अनेकांना माहीत आहे. त्यामुळे अनेकजण हे व्यवसाय करण्याचे धाडस करतात. कोणाला काय दिले की अभय मिळते, हेही हे लोक जाणून असतात. त्यामुळे त्यांचा हा व्यावसाय तेजीत सुरू आहे. सर्वांना फायदा असल्याने ‘तेरी भी चूप आणि मेरी भी चूप’ या न्यायाने हे राजरोस सुरू आहे.
एका पवित्र वनस्पतीच्या नावाने सुरू असलेल्या धाब्यावर दारूविक्री गेली अनेक वर्षे सुरू आहे. रात्री-अपरात्री कधीही येथे दारू मिळते. वेळेचे बंधन येथे कधीच नसते. ‘ड्राय डे’ असेल, तर येथील थाट काही औरच असतो. तसेच गोवरे रस्त्यावर एका झाडाखालीही दिवसभर दारूविक्री सुरू असते. काही युवक येथे बिनधास्त दारूविक्री करीत असतात. पान टपऱ्या तर गुटखा आणि मटका विकूनच फायद्यात आहेत. सकाळ, संध्याकाळ कॉलेज रस्त्यावर मटका घेतला जातो. मात्र, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. या सर्व प्रकाराने येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- चौकट
पोलिसांच्या पाठीमागे अवैद्य व्यावसाय
कृष्णा कॅनॉलवर वाहतूक पोलीस वाहतुकीला शिस्त लावीत उभे असतात. नियम मोडणाऱ्या प्रत्येकाला यांची धास्ती असते. मात्र त्यांच्या पाठीमागे काही अंतरावर मागेल तेव्हा दारू मिळते. ‘ड्राय डे’ असेल तर ज्यादा दर आकारून तळीरामांना हे दारू पुरवतात. त्यामुळे याबाबत माहिती नाही की जाणून बुजून कानाडोळा होतोय, याबाबत नागरिक उलट सुलट चर्चा करीत आहेत.