सातारा : जिल्ह्यात गल्लो-गल्ली मटक्याचे जाळे तयार करणाऱ्या मटकाकिंग समीर कच्छीसह (रा. मोळाचा ओढा परिसर, सातारा) त्याच्या ४२ साथीदारांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. विषेश म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येची एकाच वेळी मोक्का कारवाई झालेली महाराष्ट्रातील ही पहिली घटना आहे. मटकाकिंग समीर उर्फ शमीम सलीम शेख उर्फ कच्छी याने त्याच्या साथीदारांनी ‘कच्छी गॅंग’ नावाची टोळी तयार केली होती. या टोळीच्या माध्यमातून संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये मटका, जुगाराचे जाळे तयार केले होते. त्यातून मिळणारा काळा पैसा गरजू लोकांना देऊन त्यांच्याकडून व्याजापोटी जास्त रक्कम जबरदस्तीने वसूल केली जात होती. एवढेच नव्हे तर व्याजाचे पैसे न दिल्यास टोळीच्या माध्यमातून पैशासाठी अपहरण करून, मारहाण करून जबरदस्तीने पैसे वसूल केले जात होते. एका तक्रारदाराने पुढे होऊन मटकाकिंग समीर कच्छी याच्यासह त्याच्या टोळीविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या.
आतापर्यंत मटकाकिंग समीर कच्छीसह त्याच्या साथीदारांवर दोनशेहून अधिक जुगाराचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी त्याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारे यांच्याकडे पाठविला होता. मात्र, फुलारे हे गेल्या आठवड्यात सातारा जिल्ह्याच्या दाैऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी साताऱ्यातच या प्रस्तावावर स्वाक्षरी करून मोक्का कारवाईवर शिक्कामोर्तब केले. पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, पोलिस अधीक्षकांचे वाचक व सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे, सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, दीपक इंगवले, राजू कांबळे, महेश शिंदे, केतन शिंदे यांनी या कारवाईसाठी मोलाची कामगिरी बजावली.गोव्यापर्यंत कनेक्शन...मटकाकिंग समीर कच्छी याच्या गॅंगचे गोव्यापर्यंत कनेक्शन असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. गोव्यातील मडगाव येथे सातारा पोलिसांनी छापा टाकून तब्बल ४२ जणांना अटक करून साताऱ्यात आणले. त्यांच्याकडून १ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता.
गुन्ह्यांची यादी हैराण करणारी...मटकाकिंग समीर कच्छीच्या गुन्ह्यांची यादी हैराण करणारी आहे. दोनशेहून अधिक जुगाराचे गुन्हे, जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न, खुनासाठी अपहरण, गंभीर दुखापत, सरकारी नोकरावर हल्ला, गर्दी मारामारी, फसवणूक अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
आतापर्यंत ९० जणांना मोक्का...नोव्हेबर २०२२ पासून आतापर्यंत पाच मोक्का प्रस्तावांमध्ये तब्बल ९० जणांना मोक्का लावण्यात आला आहे. तसेच ११ जणांवर हद्दपारी आणि १ व्यक्तीवर झोपडपट्टी दादा कायद्यांतर्गत (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे.