कोल्हापूर : राजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा-शर्तीच्या भंगाबाबत केलेल्या कारवाईच्या विरोधात दाद मागण्यासाठी असलेले महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) रद्द करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. हा निर्णय झाल्यास दाद मागण्यासाठी लोकशाहीने दिलेले हे न्यायपीठ हिरावले जाईल, अशा प्रतिक्रिया अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून उमटत आहेत. शासनाने ‘मॅट’ रद्द केलेच, तर ताकदीने त्याला विरोध करण्याची व्यूहरचना आखली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात रविवारी (दि. ५) महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची बैठक होत आहे.एका प्रकरणात शासनविरोधी निर्णय दिल्याने ‘मॅट’ रद्द करण्याचा विचार राज्य शासनाकडून सुरू असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती. यामुळे राजपत्रित अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये याबाबत मंत्रिमंडळासमोर हा विषय आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांचे दावे वेगाने निकाली निघावेत, यासाठी १९९५ मध्ये संविधानातील ३२३ (अ) कलमानुसार केंद्र सरकारने केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (कॅट)ची स्थापना १९८५ साली केली. त्यानुसार राज्यात ‘मॅट’ची स्थापना १९९२ मध्ये झाली. आता शासनाच्या विरोधात निर्णय जात असल्यामुळे ‘मॅट’ बरखास्तीचा जो विचार मांडला जात आहे, तो निश्चितच भारतीय संविधानविरोधी आहे, असे महासंघाचे म्हणणे आहे.प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष हे मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा सेवानिवृत्त न्यायाधीश, तर सदस्य हे प्रशासकीय सेवेतील अनुभवी व ज्येष्ठ अधिकारी आहेत. बदल्या आणि अन्य सेवांविषयक बाबींसंबंधी ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर प्रशासन अथवा शासनाकडून अन्याय होतो, असेच अधिकारी-कर्मचारी ‘मॅट’कडे धाव घेतात, अशा सर्व प्रकरणी ‘मॅट’चे सदस्य त्याबाबत शासनाची भूमिका प्रथम जाणून घेतात व नंतर त्यांचे निकालपत्र देतात. या न्यायाधिकरणाचा निर्णय शासनास मान्य नसेल तर शासन उच्च न्यायालयात जाऊ शकते. असे सर्व असताना मनमानी कारभार करण्यासाठी ‘मॅट’ बंद करण्याचा निर्णय लोकशाही विरोधी असल्याचा आरोप महासंघाचा आहे. (प्रतिनिधी)रविवारी पुण्यात बैठक...शासनाने हा निर्णय घेतल्यास त्याला कडाडून विरोध करण्यासाठी राजपत्रित अधिकाऱ्यांच्या ७० संघटनांचे राज्यभरातील एक लाख २० हजार सदस्य रस्त्यावर येणार आहेत. याबाबत रणनीती ठरविण्यासाठी रविवारी (दि. ५) पुण्यात बैठक होत आहे.अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रक्षणासाठी लोकशाहीने दिलेले ‘मॅट’ हे शस्त्र आहे. ते रद्द झाल्यास सरकारकडून मोठा अन्याय होईल. ज्या दिवशी हा निर्णय होईल, त्या दिवशी राज्यातील सर्व अधिकारी काम बंद करून रस्त्यावर येतील. आम्ही सरकारला यासंदर्भात पूर्वसूचना दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी घाईगडबडीत निर्णय घेऊ नये. मंत्री बापट यांनीही हा विषय प्रतिष्ठेचा करू नये.- ग. दि. कुलथे, संस्थापक, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ.
‘मॅट’ रद्द म्हणजे लोकशाही स्वातंत्र्यावरील घाला
By admin | Published: July 01, 2015 11:10 PM