ऑनलाइन लोकमतलोणंद, दि. ५ : पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे, हेचि घडो मज जन्मजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही दुजे...
ही भावना उराशी बाळगून सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी निघालेले लाखो वारकरी, नभांगणी फडकणा-या भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा गगनभेदी निनाद, ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष अन देहभान विसरुन नाचणारा वैष्णवांचा मेळा, अशा भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात नीरातीरी मंगळवारी दुपारी उत्साहात स्वागत झाले.
माऊलींच्या सहवासात पंढरीच्या विठुरायाची वारी पूर्ण करण्याची आस मनात बाळगून अवघ्या महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातूनही लाखो वारकरी आज लोणंदनगरीत दाखल झाले आहेत. सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा नदीच्या तीरावर पुणे जिल्ह्यातून पालखीचे दुपारी आगमन झाले.
यावेळी पालखीच्या स्वागतासाठी आमदार मकरंद पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवरांसह हजारो भाविक उपस्थित होते. नीरा नदीवरील पुलावर माउलींच्या पालखीचा रथ थांबल्यानंतर प्रथेप्रमाणे नदीतील पाण्याने माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले.