लोणंद : पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान,आणिक दर्शन विठोबाचे,हेचि घडो मज जन्मजन्मांतरी,मागणे श्रीहरी नाही दुजे...ही भावना उराशी बाळगून सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी निघालेले लाखो वारकरी, नभांगणी फडकणाऱ्या भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा गगनभेदी निनाद, ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष आणि देहभान विसरून नाचणारा वैष्णवांचा मेळा अशा भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात नीरा तीरी मंगळवारी उत्साहात स्वागत झाले.माउलींच्या सहवासात पंढरीच्या विठुरायाची वारी पूर्ण करण्याची आस मनात बाळगून अवघ्या महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातूनही लाखो वारकरी लोणंदनगरीत दाखल झाले. सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा नदीच्या तीरावर पुणे जिल्ह्यातून पालखीचे दुपारी दोनला आगमन झाले. यावेळी पालखीच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील मान्यवरांसह हजारो भाविक उपस्थित होते. नीरा नदीवरील पुलावर माउलींच्या पालखीचा रथ थांबल्यानंतर प्रथेप्रमाणे माउलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले.पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे पालखीचे सूत्र सुपूर्त केले. पोलिस अधीक्षक संदीप पाटील, आमदार मकरंद पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, सभापती नितीन भरगुडे-पाटील, उपसभापती सारिका माने, पंचायत समिती सदस्य रमेश धायगुडे, अनिरुद्ध गाढवे, तहसीलदार शिवाजीराव तळपे, गटविकास अधिकारी दीपा बापट, युवक काँग्रेसचे राहुल गाढगे, शामराव गाढवे आदींनी पालखीचे स्वागत केले. यावेळी समता आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी ढोल, लेझीमचे सादरीकरण करून स्वागत केले. त्यानंतर पालखी सोहळा लोणंदकडे मार्गस्थ झाला. (प्रतिनिधी)नीरा तीर दुमदुमलामाउलींच्या पादुकांना नीरा नदीपात्रात दत्तघाटावर अभ्यंगस्नान घातले. त्यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. माउलींचा हा सोहळा पाहण्यासाठी हजारो वैष्णवांनी ‘माउली, माउली..’चा जयघोष केला. दुपारी दोन वाजता अभ्यंगस्नान झाल्यानंतर पादुका रथामध्ये ठेवण्यात आल्या. दिंडी प्रमुखांच्या आदेशाने पालखी रथ जिल्ह्याच्या स्वागतकमानीजवळ आला. त्याठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत केले.
माउलींचे पाऊल साताऱ्याच्या अंगणात!
By admin | Published: July 05, 2016 11:30 PM