सागर गुजरसातारा : सातारा आणि जावळी तालुक्यात पुन्हा एकदा भावनेच्या मुद्द्यावर मनोमिलनाचे संगीत वाजू लागले आहे. दोन्ही राजेंनी जाहीरपणे इथून पुढच्या काळात बंध मजबूत ठेवण्याच्या आणाभाका घेतल्या आहेत. राजेंनी केलेल्या आवाहनाला मावळ्यांनी नुकत्याच झालेल्या मेळाव्यात प्रतिसाद दिला आहे. विधानसभा निवडणुकीतही हे बंध टिकून राहावेत, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघा बंधूंनी मंगळवारी (दि. २६) रात्री झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पुन्हा मनोमिलन केले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार बाळासाहेब पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांचे काम करणार असल्याचे जाहीरपणे सांगितले.
या मेळाव्यामुळे खासदार उदयनराजे भोसले आणि इतर आमदार मंडळींमध्ये असणारा तिढा सुटल्याची चर्चा सुरू झाली आहे. या मेळाव्यात दोन्ही राजेंच्या विविध गावांतील प्रमुख कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये लालासाहेब पवार, बाळासाहेब गोसावी, सतीश चव्हाण, निशांत पाटील, अशोक मोने, चंद्रकांत जाधव आदींनी उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजेंच्या गटांतर्गत असलेली भावना प्रातिनिधिक स्वरुपात व्यक्त केली.दोन्ही राजेंच्या संघर्षात लोकांचेच नुकसान होत असल्याचे यावेळी अनेकांनी सांगितले. संघर्ष सोडून एकी ठेवा, शहर व गावागावातील मोठ्या प्रमाणावर बेरोजगारांचा प्रश्न आहे. तो सोडविण्यासाठी दोन्ही राजेंनी प्रयत्न करायला हवेत, उदयनराजेंनीही विधानसभेला हात काढून घेऊ नये, अशी सूचनाही यावेळी कायकर्त्यांनी धाडसाने मांडली.
दरम्यान, सख्खे मामा दादाराजे खर्डेकर आणि प्रतापराव भोसले यांच्यात लढत झाली असताना दिवंगत भाऊसाहेब महाराजांनी पक्षनिष्ठा दाखवत भोसले यांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला होता, असे शिवेंद्रसिंहराजेंनी सांगितले.
पक्षाचे काम करत असताना कुठलाही दगाफटका आपल्याकडून होणार नाही, असा भरोसा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जाहीरपणे दिल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांचा जीव एकदाचा भांड्यात पडला.प्रेम द्या.... रक्ताचं पाणी करूमागील लोकसभा निवडणुकीत आम्ही रक्ताचं पाणी करून खासदार उदयनराजे भोसले यांचा प्रचार केला होता. काटकरांवर जसं प्रेम करता, तसं प्रेम आमच्यावरही केलं तर या निवडणुकीतही आम्ही रक्ताचं पाणी करू, अशी भावना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी व्यक्त केली.मानकुमरेंची जीभ घसरली..जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंत मानकुमरे यांची जीभ या मेळाव्यात पुन्हा घसरली. व्यासपीठासह प्रेक्षकांमध्ये महिलाही बसलेल्या असताना मानकुमरे यांनी बाबांचा खांदा दाबता, तसा आम्हालाही ..... उदयनराजेंनी आमची पप्पी घ्यावी,असं वक्तव्य केल्याने हशा पिकला. मात्र, काहींनी तोंडावर हात ठेवला.आपलं झालं...गावाकडच्या लोकांचं कायसाताऱ्यात झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला सातारा आणि जावळी तालुक्यातील सातारा विकास आघाडी व नगरविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये सातारा, जावळीतील नगरसेवक, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य तसेच अजिंक्यतारा साखर कारखान्यांचे संचालक, सोसायट्यांचे संचालक उपस्थित होते. या मेळाव्यात आपलं मनोमिलन झालंय; पण दोन्ही तालुक्यांतील खेडोपाडी दोन राजेंचे गट-तट अजूनही तणावात आहेत. ते गट-तट मिटविण्यासाठीही काम करावं लागेल, अशी भूमिका सतीश चव्हाण यांनी व्यक्त केली.कानाला लागून गैरसमज पसरवणारे कोण?आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या भाषणामध्ये कानाला लागून गैरसमज पसरविणाऱ्यांचा बंदोबस्त केला जाईल, असे ठणकावून सांगितले. दोन्ही आघाड्यांमध्ये असे लोक आहेत, आता हे लोक कोण? व त्यांच्याबाबत काय निर्णय होणार? याबाबत कार्यकर्त्यांना उत्सुकता लागली आहे.