मायणी : मायणी-कातरखटाव राज्यमार्ग अनेक ठिकाणी खचला असल्याने या मार्गावर दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढच होत आहे. त्यामुळे महामार्ग चांगल्या दर्जाचा करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थ व वाहनचालकांमधून होत आहे.
मिरज-भिगवण राज्यमार्गावरील खटाव तालुक्याच्या हद्दीत असलेल्या मायणी-कातरखटाव राज्यमार्गाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. हा मार्ग अनेक ठिकाणी खचला आहे. यामध्ये प्रामुख्याने मायणीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेला धोंडेवाडी गावाच्या हद्दीवर सुमारे २०० मीटर अंतर पूर्ण एका बाजूला खचले आहे. तुपेवाडी गावाच्या हद्दीत व कातरखटाव गावाच्या दक्षिण बाजूस असलेल्या छोट्या पुलाजवळ एका बाजूस, तर इतर काही ठिकाणी दोन्ही बाजूस खचलेला आहे. शिवाय साईडपट्ट्या पूर्ण खराब झाल्या आहेत. तसेच साईडपट्ट्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्या ठिकाणी अनेक लहान-मोठे अपघात नित्यनियमाने घडत आहेत.
या परिसरात असलेल्या साखर कारखान्याची ऊस वाहतूक याच मार्गाने सुरू असल्याने प्रत्येक हंगामामध्ये कमीत कमी तीन ते चारवेळा या ठिकाणी उसाची ट्रॉली पलटी होत आहेच. संपूर्ण रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला ऊस पडत आहे. पलटी झालेल्या ऊस ट्रॉलीमुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहेच, शिवाय ट्रॅक्टर मालकालाही आर्थिक फटका बसत आहे. रात्रीच्यावेळी उसाची ट्रॉली पलटी झाली तर या मार्गाची वाहतूक तासन् तास ठप्प होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या खचलेल्या रस्त्याची केवळ डागडुजी न करता चांगल्या दर्जाचा राज्यमार्ग करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ व वाहनचालक करत आहेत.
(चौकट)
चालकाला काढावी लागतेय रात्र जागून...
प्रत्येकवर्षी कारखाने चालू झाल्यानंतरच्या हंगामामध्ये खचलेल्या राज्यमार्गाच्या सुमारे २०० मीटर अंतराच्या ठिकाणी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉल्या नित्यनियमाने कमीत कमी चार ते पाच वेळा पलटी होत आहेत. त्यामुळे उसाची राखण करण्यासाठी ट्रॅक्टर चालकाला रात्र जागून काढावी लागत आहे.
(चौकट)
पंधरा किलोमीटर अंतरामध्ये हजारो खड्डे !
मायणी-कातरखटाव राज्यमार्गातील सुमारे १५ किलोमीटर अंतरावर तीन ते चार ठिकाणी राज्यमार्गाची एक बाजू पूर्ण खचली आहे, तर हजारो खड्डे या मार्गावर पडले आहेत. तरी संबंधित विभागाकडून प्रत्येकवर्षी या ठिकाणी फक्त डागडुजी केली जात आहे.
०८मायणी..
मायणीपासून तीन किलोमीटर धोंडेवाडी गावाच्या हद्दीनजीक असलेल्या मार्गावर अशी ऊसट्रॉली नित्यनियमाने पलटी होत आहे. (छाया : संदीप कुंभार)