लोकमत न्यूज नेटवर्क
मायणी : मायणी-विटा राज्य मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रोज अपघात होत असून, या खड्ड्यांकडे संबंधित विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. या खड्ड्यांमध्ये कोणाचा जीव गेल्यावर संबंधित विभागाला जाग येणार आहे का? असा सवाल स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालकांमधून व्यक्त होत आहे.
येथील मिरज-भिगवण राज्यमार्गावरील मायणी-विटा दरम्यान मायणीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सातारा जिल्हा हद्दीवर सुमारे दोन फूट खोल व चार ते पाच फूट लांब खड्डा पडला आहे, तसेच या खड्ड्याजवळील मार्ग ही खचला आहे. दोन्ही बाजूला चांगला मार्ग असल्याने वाहने वेगाने येत आहेत, तसेच रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांची लाईट पडल्यावर हा खड्डा व खचलेला रस्ता दिसत नसल्याने या ठिकाणी रोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. तसेच वाहनांचेही नुकसान होत आहे. या खड्ड्यांबाबत अनेकवेळा आवाज उठवल्यानंतरही संबंधित विभाग याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नक्की हा विभाग या ठिकाणी कोणाचा जीव जाण्याची वाट बघत आहे का, जीव गेल्यानंतरच का खड्डा बुजवणार का? असा सवाल स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालक करत आहेत.
(चौकट)
जखमींना पोलिसांची मदत...
मागील पंधरा दिवसांपूर्वी या ठिकाणी पती-पत्नी दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झाले होते. तसेच शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आणखी एक वयस्कर व्यक्ती खड्ड्यात पडून जखमी झाला होता. त्यावेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पोलिसांच्या मदतीने या दोन्ही जखमींना उपचारासाठी दाखल केले होते.
(चौकट)
जिल्हा हद्दीत शेकडो खड्डे..
सातारा-सांगली जिल्ह्यातून हा राज्यमार्ग जात असतानाही सांगली जिल्ह्यातील रस्त्यांचा दर्जा सातारा जिल्ह्यापेक्षा अधिक चांगला आहे. सातारा जिल्ह्यातील या मार्गावर शेकडो खड्डे पडले आहेत तरी संबंधित विभाग याकडे म्हणावे तेवढे गांभीर्याने घेत नाही.
(चौकट )
अपघातानंतरच दुरुस्ती होणार का?
सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या या सुमारे ८० किलोमीटरच्या राज्यमार्गावर अनेक ठिकाणी एक फुटापेक्षा जास्त खोलीचे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये अनेक अपघात होत आहेत. वाहनांचे प्रचंड नुकसान होत आहे, तरीही याकडे संबंधित विभागाचा कानाडोळा सुरू आहे. त्यामुळे अपघात झाल्यानंतरच या मार्गाची दुरुस्ती होणार का? असा प्रश्न पडत आहे.
कोट...
या राज्यमार्गाची दुरुस्ती करण्याचे संपूर्ण अधिकार केंद्राकडे देण्यात आल्याचे स्थानिक अधिकारी वेळोवेळी सांगत आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य भेदभाव न करता जोपर्यंत केंद्राचा निधी येणार नाही, तोपर्यंत स्थानिक विभागाने या मार्गाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
-प्रशांत कोळी, पोलीस पाटील, मायणी
२३मायणी
मायणी-विटा राज्य मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सतत अपघात होत आहेत. (छाया: संदीप कुंभार)