मायणी : कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तसेच शासनामार्फत शनिवार व रविवार संपूर्ण लाॅकडाऊन व संचारबंदी घोषित केल्यामुळे सलग दुसऱ्या रविवारचा मायणी आठवडी बाजार बंद राहिला. तसेच मल्हारपेठ पंढरपूर व मिरज भिगवण या दोन्ही राज्य मार्गांवरही शनिवार-रविवार शुकशुकाट पसरला होता.
याबाबत अधिक माहिती अशी, परिसरातील विविध गावांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. चितळी तालुका खटाव येथे मागील शुक्रवारी व शनिवारी मिळून एकवीस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार गावामध्ये संपूर्ण लाॅकडाऊन घोषित केला. त्यामुळे सलग तीन-चार दिवस चितळी संपूर्ण गाव बाजारपेठ बंद ठेवली होती.
कलेढोण व परिसरामध्येही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने गावातील विविध भाग कंटेन्मेंट झोन घोषित करून येथील आठवडी बाजार सलग दोन मंगळवारी बंद ठेवला होता. तसेच उद्याचा आठवडी बाजार ही बंद राहणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मायणी शेजारी असलेल्या या दोन्ही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. तसेच मायणी गावातील विविध भागांमध्येही रोज एक-दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने मागील रविवारी ग्रामपंचायतीने माहिती फलक लावून आठवडी बाजार रविवारचा बंद असल्याबाबत सूचना व्यापाऱ्यांना व ग्रामस्थांना दिल्या होत्या.
या शनिवार-रविवार हे दोन दिवस शासनाकडूनच संपूर्ण लाॅकडाऊन घोषित केल्याने सलग दुसऱ्या रविवारी मायणी आठवडी बाजार बंद राहिला.
सर्वत्र लाॅकडाऊन, संचारबंदी व कडक निर्बंध असल्याने बाजारपेठेत व राज्यमार्गावर वर्दळ कमी असल्याने अनेक अत्यावश्यक व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांनीही पुरेसे ग्राहक नसल्याने दुकाने बंद ठेवली होती. गावातून जाणाऱ्या मल्हारपेठ पंढरपूर व येथील चांदणी चौकातून जाणाऱ्या मिरज भिगवन या दोन्ही राज्यमार्गांवर शनिवार-रविवार शुकशुकाट पसरला होता.
फोटो - मायणीत सलग दुसऱ्या रविवारी आठवडी बाजार बंद होता. तर राज्यमार्गावर शुकशुकाट होता. (संदीप कुंभार)