लोकमत न्यूज नेटवर्क
मायणी : खटाव तालुक्यातील मायणी व येरळवाडी तलाव परिसरामध्ये पक्ष्यांच्या विविध जाती वर्षभर पाहावयास मिळत असतात. त्यामुळे शासनामार्फत पक्ष्यांचे संरक्षण व्हावे. यासाठी या भागास मायणी पक्षी संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित केले होते. मात्र आता हे क्षेत्र ‘संवर्धन राखीव क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबत राजपत्र (अधिसूचना) नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यासाठी मायणी, कानकात्रे, अंबवडे, नडवळ, येरळवाडी, बनपुरी गावांच्या परिसरातील ८६६ हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.
कोल्हापूर वनवृत्तमधील सातारा जिल्ह्याच्या सातारा वनविभागाच्या वडूज वनपरिक्षेत्राच्या मायणी पक्षी संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये परिस्थितीकीय, प्राणीजातीय व वनस्पतीविषयक महत्त्वाचे असल्याने यामध्ये लेसर फ्लेमिंगो, ग्रेटर फ्लेमिंगो, ब्लॅक-टेल्ड, गाॅडविट, जकाना, ओपन बिल्ड स्टोर्क आदी पक्षी व त्यातील प्राणी जाती व वनस्पती तसेच संरक्षित करण्याच्या प्रयोजनार्थ महाराष्ट्र शासनाचा स्थानिक सामुदायिक विचारविनिमय केल्यानंतर हे क्षेत्र संवर्धन क्षेत्र म्हणून गठित करणे गरजेचे आहे, असा निर्णय घ्यावा असे वाटले.
त्यामुळे वन्य संरक्षण अधिनियम कायद्यातील सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने अधिसूचना (राजपत्र) शासनाचे उपसचिव (वने) गजेंद्र नरवणे यांनी प्रसिद्ध केली. यामध्ये मायणी पक्षी संवर्धन राखीव या नावाने ओळखले जाणारे क्षेत्र आता ‘संवर्धन राखीव क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये समूह क्रमांक एक मायणी तलाव व समूह क्रमांक दोन येरळवाडी तलाव असे दोन समूह निश्चित करण्यात आले आहेत.
यामध्ये मायणी तलाव व परिसर २१८.२४ हेक्टर, कानकात्रे तलाव व परिसर सुमारे १४.९४ हेक्टर, अंबवडे परिसर ७०.७२ हेक्टर, नडवळ परिसर १३२.४० हेक्टर, येरळवाडी तलाव बुडीत क्षेत्र ३२६.२४ हेक्टर व बनपुरी तलाव बुडीत क्षेत्र १०४.२१ असे एकूण ८६६.७५ हेक्टर म्हणजे ८.६७ चौरस किलोमीटर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.
या संवर्धन राखीव क्षेत्रसाठी राखीव वनक्षेत्र व शासकीय जमीन निश्चित करण्यात आली असून, या सर्व क्षेत्राच्या सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील या भागाचा आता फक्त पक्षी संवर्धन करण्यासाठी उपयोग न करता पक्ष्यांबरोबर वन्य प्राण्यांचे संवर्धन या राखीव क्षेत्रात होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
(दोन कोट येणार आहेत..)