सातारा : सातारचे नगराध्यक्ष सचिन सारस आणि त्यांचे बंधू अमोल यांना गुंड राजू रामदास नलावडे ऊर्फ शेंबडा राजा याने दोन लाखांच्या खंडणीसाठी धमकावल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. ‘तुला आणि तुझ्या भावाला दिसेल तिथे गोळ्या घालीन,’ अशी धमकी राजूने अमोल यांना दिली. तसेच खुद्द नगराध्यक्षांना त्यांच्या केबिनमध्ये जाऊन सोमवारी धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.राजू नलावडे याच्या दहशतीमुळे यापूर्वी आपण त्याला २५ हजार रुपये दिले असून, उर्वरित एक लाख ७५ हजारांसाठी तो वारंवार धमकावत आहे, असे नमूद करून नगराध्यक्षांचे बंधू अमोल अशोक सारस (वय ३३, रा. ५१३, मंगळवार पेठ, सातारा) यांनी तक्रारीत (पान १ वरून)म्हटले आहे की, ‘तुझ्या भावाला नगरसेवक म्हणून मीच निवडून आणले आणि नगराध्यक्षही मीच केले. तू मला दोन लाख रुपये दे,’ असे म्हणून राजू नलावडे मला मे महिन्यापासून धमकावू लागला. मंगळवार पेठेतील दत्त मंदिर रस्ता, दत्त चौक आणि घरी येऊन ‘तुझ्या भावाला अगर तुला दिसेल तिथे गोळ्या घालीन व जिवे मारीन,’ अशा शब्दांत तो धमकावू लागला. राजू विरुद्ध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याने व तो गुन्हेगार असल्याने त्याच्या भीतीपोटी मी मे महिन्याच्या अखेरीस त्याला २५ हजार रुपये दिले. हा प्रकार मी माझे नगराध्यक्ष बंधू सचिन सारस यांना सांगितला नव्हता.गेल्या काही दिवसांपासून राजू नलावडे पुन्हा माझ्याकडे उर्वरित एक लाख ७५ हजारांची मागणी करून रस्त्याने जाता-येता शिवीगाळ व दमदाटी करीत होता. त्यावेळी मी ही बाब बंधू सचिन यांना सांगितली. भीतीपोटी २५ हजार रुपये दिल्याचेही सांगितले. त्यावेळी सचिन यांनी ‘आता तू यात लक्ष घालू नकोस. मी पाहून घेतो,’ असे मला सांगितले. त्यानंतर राजू मंगळवारी (दि. ३०) दुपारी चार ते रात्री दहापर्यंत चार ते पाचवेळा आमच्या घरी आला. ‘अध्यक्ष (सचिन सारस) कोठे आहेत? पैशांचे काय केले? त्यांना फोन करून आताच्या आता बोलावून घे,’ असे म्हणून तो मला दमदाटी करू लागला. परंतु, सचिन कोठे गेले आहेत, हे मला माहीत नाही, असे मी त्याला सांगितले.दरम्यान, रात्री साडेदहा वाजता सचिन सारस घरी आल्यावर राजू चार-पाच वेळा येऊन गेल्याचे मी त्यांना सांगितले. पैशांची मागणी करून तो धमकावत होता, असेही सांगितले. तेव्हा सचिन सारस यांनाही त्याने पालिकेतील त्यांच्या कक्षात जाऊन पैसे मागितल्याचे समजले. शाहूपुरी पोलिसांनी राजू नलावडेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.सोमवारी (दि. २९ जून) राजू नलावडे पालिकेतील नगराध्यक्षांच्या कक्षात आला होता. सचिन सारस यांना त्याने एक लाख ७५ हजार मागितले, परंतु ‘नंतर पाहू’ असे सचिन यांनी सांगितल्यावर तो परत गेला होता. नंतर मंगळवारीही (दि. ३०) तो नगराध्यक्षांच्या कक्षात गेला होता, परंतु नगराध्यक्ष तेथे नसल्याने रागाने शिव्या देत निघून गेला, असे त्यांना नंतर समजल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
नगराध्यक्षांना गुंडांकडून धमकी
By admin | Published: July 01, 2015 11:43 PM