सातारा : चार वर्षांच्या कार्यकालात नगराध्यक्षा माधवी कदम यांना कोणतेही ठोस काम करता आले नाही. फंड नाही असे कारण सांगत त्यांनी आजवर अनेक नगरसेवकांची कामे अडविली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवात नगराध्यक्षांचा खारीचा वाटा आहे. टक्केवारीशिवाय त्यांच्याकडून कोणतेच काम होत नाही, असा आरोप बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी केला.
बांधकाम विभागाच्या मंजूर ठरावावर नगराध्यक्षा माधवी कदम सही करीत नसल्याच्या तक्रारीवरून सातारा विकास आघाडीत नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणावरून सत्तारूढ आघाडीच्या बांधकाम सभापती सिध्दी पवार यांनी मंगळवारी सकाळी त्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर जोरदार प्रहार केला.
त्या म्हणाल्या, एकूण फंडाच्या म्हणजे बजेटच्या पंधरा टक्के रक्कम ही नगराध्यक्षांचा फंड म्हणून शासनाने दिलेली आहे. त्याचा सर्वस्वी अधिकार म्हणजे तुमच्या भाषेत सह्यांचे अधिकार तुम्हालाच दिले आहेत. आता प्रत्येक वर्षी पंधरा ते वीस कोटी रुपये नगराध्यक्षांचा फंड होतो. म्हणजे गेल्या चार वर्षांत सुमारे ६० ते ८० कोटी रुपयांची विकास कामे होणे अपेक्षित होते आणि एवढा मोठा फंड असतानाही फंड नाही..फंड नाही म्हणून आपणच अनेक नगरसेवकांची कामे अडविली. आपण कसा आणि कुठे कोणाला फंड दिला याची बित्तंबातमी पुराव्यासहित आहे.
आज भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून उदयनराजे भोसले यांना पराभवाला सामोरे जावे लागले ते निव्वळ आपल्यासारख्या निष्क्रिय व्यक्तीमुळेच. तुम्हांला तुमच्या टक्केवारीशी कायम घेणे-देणे होते. जनतेने तुम्हाला अक्का समजून मतदान केले. त्याला आपण बुक्का लावू नका. माझ्या नादाला तर मुळीच लागू नका. अन्यथा तुमचा नादच पुरा करीन. माझे ज्या दिवशी जास्त तोंड उघडेल त्या दिवशी तुम्ही अडचणीत याल हे ध्यानात असू द्या.
ज्या वेळेला सभेचे प्रोसिडिंग जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. त्या प्रोसिडिंगमध्ये लिहिलेला ठराव सही करायला तुम्हाेला वेळ लागतो आणि जर ठराव सभागृहात सर्व नगरसेवकांच्यामते मान्य होतो हे ठराव चुकीचे असतील म्हणून तुम्ही अडवताय. आपण फार सह्या करणारे आहात आणि जबाबदारीची जाणीव असणारे आहात तर आपल्याला ही माहिती हवी की एकदा सभेचे प्रोसिडिंग जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले की त्यामध्ये बदल करता येत नाही. मी स्वत: जवळून कारभार तुमचा बघत आहे. तुमची गौरवांकित कारकीर्द आम्हांला नवीन नाही. त्यामुळे तुम्ही सह्या का अडवित होता हे आम्हांला चांगले माहीत आहे. शाहू कला मंदिराचे काम गेले दीड वर्ष झाले पूर्ण झाले नाही. असा काय सोन्याचा मुलामा देत आहा? अशी टीका पवार यांनी केली.