चाफळ :
पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील माजगाव कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले आहे. मंगळवारच्या अहवालात एकूण नऊजण बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दिवसेंदिवस माजगावात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढच होत चालली असून, कोरोना संक्रमणाचा विळखा वाढू लागल्याने ही चिंतेची बाब बनली आहे. सध्या माजगावमध्ये एकूण २० जण बाधित आहेत.
येथील बऱ्याच लोकांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कुराडे यांनी त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या करून घेतल्या. यात मंगळवारी एकाच वेळी नऊजण बाधित आढळून आले आहेत. यापूर्वी गत आठवड्यात माजगावमध्ये सहा जण त्यानंतर तीन व दोन असे ११ जण बाधित आढळून आले होते. माजगावात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढच होत चालली आहे. गावाला कोरोना संक्रमणाचा विळखा वाढू लागल्याने ही बाब चिंतेची बनली आहे.
गत आठवड्यात माजगाव येथे ११ कोरोनाबाधित आढळून आले होते. यानंतर त्यांच्या संपर्कातील व हायरिस्कमधील लोकांच्या सोमवारी आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्याचा अहवाल मंगळवारी आला. यात नव्याने ९ बाधितांची भर पडल्याने माजगावचा कोरोनाबाधितांचा आकडा २० वर पोचला आहे.
ग्रामपंचायतीत प्रशासन व ग्रामस्तरीय कोरोना समितीचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावात सर्वत्र औषधफवारणी करत नाल्यावर टीसीएल पावडर, धूर फवारणी मोहीम राबवली आहे.आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेत उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.