दत्ता यादव
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : अनेक गावांची अशी नावे आहेत की ती ऐकली किंवा वाचली की विचित्र वाटतं. अशी अनेक गमतीशीर गावांची नावे सातारा जिल्ह्यातही आहेत. प्रत्येक छोट्या-मोठ्या गावाला तेथील पार्श्वभूमीचा गावाच्या नावाला इतिहास असतो. एखाद्या गावाचं नाव ऐकलं की, त्याचा इतिहास काय असेल, याची उत्सुकता लागून राहते. गावाचं नाव असं का बरं ठेवलं असेल. असे प्रश्न अनेकांच्या मनात घर करून राहतात. अशाचप्रकारे पाटण तालुक्यातील तारळे खोऱ्यातील डोंगरावर वसलेलं रेडेवाडी हे गाव अनेकांच्या औसुक्याचं ठरलंय.
साताऱ्यापासून ४० किलोमीटर अन् पाटण तालुक्यातील तारळेपासून १५ किलोमीटरवर असलेले हे रेडेवाडी गाव. या गावचं रेडेवाडी नाव का ठेवल गेलं, याचा इतिहास गावातील ८० वर्षांचे कोंडीबा शेडगे सांगताहेत. मी लहान होतो. त्यावेळी माझे आई-वडील सांगायचे. आपल्या गावाचं नाव पूर्वी शेडगेवाडी होतं. डोंगरावर हे गाव वसल्यामुळे इथं उदरनिर्वाहाचं साधन काहीच नव्हतं. त्यामुळे वाडीतील बहुतांश लोक गुरे पाळत होते. दूध आणि रेडे विक्रीतून लोकांचा उरनिर्वाह चालायचा. हळूहळू जनावरांच्या व्यवसायामुळे या गावाचं टोपण नाव रेडेवाडी असं आजूबाजूच्या गावांतील लोकांनी ठेवलं आणि ते पुढे प्रचलित झालं. या वाडीत तसं पाहिलं तर शेडगे आणि माने आडनावाचे लोक राहतात. त्यामुळे पूर्वी ही वाडी शेडगेवाडी या नावाने ओळखली जात होती. परंतु टोपण नाव एवढं लोकांच्या तोंडपाठ झाल की, या गावची महसूली नोंदही रेडेवाडी या नावाने झाली. ही वाडी कडवे खुर्द ग्रामपंचायतअंतर्गत येते. या वाडीतील युवक वर्ग नोकरीच्या निमित्ताने मुंबई, साताऱ्यात स्थायिक झाला. जेमतेम शंभर ते दीडशे लोकसंख्येची ही रेडेवाडी अशा वेगळ्या नावाने ओळखतेय, याची सध्याच्या तरूणाईच्या मनात कुठेतरी खंत आहे. पण आता या रेडेवाडीचं नाव कोण बदलणार, त्यासाठी कोणी प्रयत्न करणार, असा प्रश्न तेथील युवकांसमोर आहे.
अत्यंत दुर्गम भागातील डोंगरावर ही रेडेवाडी वसलेली आहे. मुलांना शाळेत जाण्यासाठी आठ ते दहा किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागते. रस्ता आहे तर पाणी नाही, अशी स्थिती या गावची आहे. सध्या केवळ वयस्कर लोकच या गावात राहताहेत. युवक वर्ग नोकरीनिमित्त घराबाहेर पडलाय. आता पूर्वीसारखी या गावात गुरे नाहीत. पण रेडेवाडी गावचं नाव सांगायला आम्हांला कोणताही कमीपणा वाटत नाही. जे पूर्वीपासून चालत आलंय, ते आम्ही स्वीकारलंय, अस कोंडीबा शेडगे यांनी मात्र, अभिमानानं सांगितलं.
.