कुसूर : कोरोनाची लक्षणे असतानाही अनेकदा कोरोनाबाधित अहवाल येईल, या भीतीने अंगावर दुखणं काढत डाॅक्टरांकडे जाण्यास टाळाटाळ करत असल्याच्या घटना ग्रामीण भागात घडताना दिसत आहेत. परिणामी बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अन्य लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे कुसूर ग्रामपंचायत आणि समितीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.
ग्रामीण भागात कोरोनाबाबत जनजागृती करणे गरजेचे झाले आहे. कोरोनाचे लक्षण असतानाही भीतीपोटी काही लोक अंगावर दुखणे काढत आहेत. तर स्थानिक समित्या आणि आरोग्य सेवक, आशा वेळोवेळी घरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. मात्र, यांनाही खरी माहिती दिली जात नाही. वेळेत उपचार घेतल्याने कोरोना बरा होऊ शकतो. मात्र, अनेकदा माहिती दिली जात नाही.
कोळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या कुसूर येथील कोरोनाबाधितांची संख्या १७ च्या वर गेल्याने ग्रामपंचायत, आशा, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, कोरोना समितीच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. संपूर्ण गावातून फवारणी, विनामास्क फिरणाऱ्या लोकांना सूचना दिल्या जात आहेत. स्वच्छतेबाबत जागृती, बाहेरील लोकांना कोरोना प्रतिबंधक क्षेत्रात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तर बाधित रुग्णांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, समिती, पोलीसपाटील, आरोग्य सेवक, आशा, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामस्थांच्या सहकार्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत.
कोट..
गावातील नागरिक आणि प्रामुख्याने व्यावसायिकांनी कोरोनाचे लक्षण दिसल्यास आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे. वेळेत उपचार झाल्यास घरी राहूनही कोरोना बरा होऊ शकतो. त्यामुळे लपवून ठेवण्याची गरज नाही. प्रत्येकाने नियमांचे पालन करून सहकार्य करावे.
- जया साळुंखे, ग्रामसेविका