नागठाणे : ‘बदलते हवामान, बाजारपेठेतील मागणी, मजूर टंचाई, कामाची गुणवत्ता या गोष्टींचा शेती उत्पादनातील यशावर परिणाम होत आहे. शेती किफायतशीर होण्यासाठी यांत्रिकीकरणाची नितांत आवश्यकता आहे,’ असे मत शास्त्रज्ञ प्रा. मोहन शिर्के यांनी व्यक्त केले.
बोरगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात आधुनिक ‘शेतीसाठी यांत्रिकीकरणाची गरज’ याविषयी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्रामार्फत यांत्रिकीकरणामध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग करणारे व विविध फवारणी व पेरणी यंत्र विकसित करणारे प्रगतिशील शेतकरी सतीश काटकर यांचा गौरव करण्यात आला. काटकर यांच्या यांत्रिकीकरणातील कार्याची नोंद घेऊन त्यांना पुणे व गुजरात येथील कंपनींकडून दोन आधुनिक पेरणी यंत्रे भेट देण्यात आली.
कार्यक्रमात प्रा. भूषण यादगीरवार यांनी हुमणी कीड नियंत्रणाविषयी मार्गदर्शन केले. प्रा. सागर सकट यांनी गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन याविषयी व प्रा. संग्राम पाटील यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञानविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना जलशक्ती अभियानांतर्गत लिंबूच्या रोपांचे वाटप जावळवाडीचे सरपंच सूर्यवंशी व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. महेश बाबर यांनी आभार मानले.