लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : केंद्र व राज्य शासनाने नुकतीच साताऱ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी दिली आहे. या महाविद्यालयास ‘छत्रपती शिवाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालय’ असे देण्यात यावे, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, साताऱ्यात होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयास महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्याचा ठराव जिल्हा परिषदेने नुकताच मंजूर केला आहे. या नावास आमचा विरोध नाही; परंतु लोकभावना व राजधानीचा आदर करून या महाविद्यालयास ‘छत्रपती शिवाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालय’ असे नाव द्यावे, अशी आमची मागणी आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा संघटनेचे तालुकाप्रमुुख शुभम शिंदे, शहरप्रमुख अजिंक्य गुजर व धनंजय खोेले यांनी दिला आहे.