पुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुसेगाव परिसरात दानशूर हातांची कमतरता नाही. येथील कोविड केअर सेंटरला काही वैद्यकीय उपकरणांची गरज असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पुसेगाव व पंचक्रोशीतील नागरिकांनी २ लाख ७ हजार ८१६ रुपयांचा निधी संकलित करून विविध वैद्यकीय उपकरणे कोविड सेंटरला भेट दिली.
पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या कोविड सेंटरमधून पाच हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मोफत उपचार व उत्तम रुग्णसेवा यामुळे उत्तर खटावमधील सर्वसामान्य, गरीब, गरजू रुग्णांसाठी हे सेंटर वरदानच ठरले आहे. मात्र, महत्त्वाची वैद्यकीय उपकरणे नसल्याने रुग्णांवर अधिक उपचार करताना डॉक्टरांना अडचणी येत होत्या. हे लक्षात आल्याने पुसेगाव कोविड केअर सेंटर मदत अभियान सुरू करण्यात आले. या अभियानात कुणालाही सक्ती न करता केवळ विश्वासाच्या जोरावर चार दिवसांत २ लाख ७ हजार ८१६ रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध झाला. या अभियानात सर्व स्तरातील नागरिकांनी सहभाग घेत आर्थिक स्वरूपात मदत केली. महत्त्वाची बाब म्हणजे व्यवहार पारदर्शक होण्यासाठी एकही निनावी मदत स्वीकारण्यात आली नाही. लोकसहभागातून जमा झालेल्या या मदत निधीतून २ लाख ५२ हजार २४ रुपये किमतीचे कार्डियक मॉनिटर, मल्टीपॅरामीटर, सक्शन मशिन्स, ऑक्सिमीटर तसेच अत्यावश्यक असणारी लरिंगो स्कोप अशी उपकरणे व मुबलक प्रमाणात सॅनिटायझर भेट देण्यात आले.
या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य गुजर, पुसेगावचे सरपंच विजय मसणे, उपसरपंच पृथ्वीराज जाधव, देवस्थान ट्रस्ट विश्वस्त रणधीर जाधव, सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले, बाळासाहेब जाधव, राजेश देशमुख, गणेश जाधव, प्रकाश जाधव, केशव जाधव, हृषीकेश पवार, रामदास शेडगे, श्रीकांत पवार, विकास जाधव आदी उपस्थित होते.
कोट :
पुसेगाव कोविड सेंटरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. सर्व जण झोकून देऊन काम करीत आहेत. त्यामुळेच त्यांना आवश्यक असणारी उपकरणे लोकसहभागातून देता आली याचा आम्हाला आनंद आहे.
- केशव जाधव, पुसेगाव
कोट :
पुसेगावसह परिसरातील नागरिकांनी कोविड सेंटर सुरू झाल्यापासून आजपर्यंत आमच्यावर विश्वास दाखवत विविध प्रकारची मदत केली आहे. आजच्या या मदतीने आमची जबाबदारी आणखी वाढली असून, आमचा काम करण्याचा हुरूपदेखील वाढला आहे.
- डाॅ. आदित्य गुजर, वैद्यकीय अधिकारी
फोटो : 12 केशव जाधव
पुसेगाव (ता. खटाव) येथील डॉ. आदित्य गुजर यांच्याकडे वैद्यकीय उपकरणे सुपूर्द करण्यात आली. या वेळी रणधीर जाधव, विजय मसणे, पृथ्वीराज जाधव, चेतन मछले आदी उपस्थित होते.