लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘साताऱ्यात कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहणार आहे. सध्या हे महाविद्यालय खासगी महाविद्यालयात सुरू करण्यात आले आहे. पहिल्या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचा मानस असून शासकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे काम पूर्ण होताच या ठिकाणी महाविद्यालय स्थलांतरित करण्यात येईल,’ अशी माहिती सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने सातारा येथे मंजूर केलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची शुक्रवारी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली. या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सं. गो. मुंगीलवार आदी उपस्थित होते.
सातारा शहरालगत कृष्णा खोरे महामंडळाकडून ताब्यात घेण्यात आलेल्या ६४ एकर जागेवर हे महाविद्यालय उभारले जाणार आहे. तब्बल ४९५ कोटी रुपयांच्या खर्चाला वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. तसेच २ कोटी ९८ लाख ५३ हजार ७९८ रुपयांच्या साहित्य खरेदीला देखील मंजुरी देण्यात आली आहे. मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जागेची पाहणी करतानाच येथील कामकाजाचा अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून आढावा घेतला. इमारतीचे काम पूर्ण होताच वैद्यकीय महाविद्यालय येथे स्थलांतरित केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
फोटो : २३ वैद्यकीय महाविद्यालय
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शुक्रवारी साताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.