पुसेगाव : खटाव तालुक्याच्या उत्तर भागात वरदान ठरत असलेल्या पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषधांचा तुटवडा असल्याचे दिसून येताच आमदार शशिकांत शिंदे यांनी स्वखर्चातून या सेंटरला फॅबीफ्लू टॅबलेटस आणि इतर औषधे दिली.
पुसेगाव व परिसरातील कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने या केंद्रात दाखल आहेत. परंतु, सध्या या प्राथमिक केंद्रात औषधांची कमतरता असल्याने रुग्णांवर उपचारासाठी अनंत अडचणी येत होत्या. ही माहिती समजताच आमदार शशिकांत शिंदे यांनी स्वखर्चातून औषधे उपलब्ध करून दिली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांच्या हस्ते या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य गुजर यांच्याकडे ही औषधे सुपूर्त करण्यात आली.
यावेळी तेजस शिंदे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना सेंटरची पाहणी केली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष ऊर्फ बाळासाहेब जाधव, ग्रामपंचायत सदस्य गणेश जाधव, तसेच प्रवीण देवकर, शहनाज शेख आणि इतर मान्यवर उपस्थित होते. प्राथमिक केंद्रातील डॉक्टरांनी केलेल्या सहकार्याबद्दल आमदार शशिकांत शिंदे यांचे आभार मानले.