मायणी : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला कलेढोण, मुळकवाडी व पाचवड मार्ग पूर्ण करण्यासाठी कलेढोण, मुळकवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन संबंधित काम मार्गी लावण्याबाबत निवेदन दिले.
कलेढोण, मुळकवाडी व पाचवड या तीन गावांना जोडणारा सुमारे दहा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडले आहे. ग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाचे व संबंधित ठेकेदाराने रखडलेल्या कामाविषयी अनेक वेळा विचारपूस केली. मात्र, प्रत्येकवेळी या मार्गाविषयी ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे संबंधितांकडून मिळत आहेत.
गेल्या चार महिन्यांपूर्वी पाचवडपासून मुळकवाडीपर्यंतचा मार्ग थोडाफार व्यवस्थित करण्यात आला. मात्र, मुळकवाडीपासून ते कलेढोणपर्यंतचे काम तेव्हापासून रखडलेलेच आहे, हे काम लवकर पूर्ण करण्याबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात व हे काम लवकर पूर्ण करण्याबाबत कलेढोण व मुळकवाडी येथील ग्रामस्थ संदीप मुळीक यांनी ग्रामपंचायतीच्या लेटरपॅडवर ग्रामविकास तथा कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मंत्रालयातील निवासस्थानी जाऊन भेट घेऊन निवेदन दिले.