प्रमोद सुकरेकराड : लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच आता विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. त्यामुळे संवेदनशील समजल्या जाणाऱ्या पाटणविधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मुंबईत जोर बैठका सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मुंबईत मेळावा झाला. तर रविवारी शिवसेना शिंदे गटाचा मेळावा मुंबईतच होत आहे. त्यामुळे मेळावे मुंबईत होत असले तरी पाटण विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो. हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेस- राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र शंभूराज देसाईंनी शिवसेनेचा 'धनुष्यबाण' हाती घेतला अन हळूहळू हा मतदारसंघ 'भगवा' झाला. देसाईनी जेव्हा शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मरळणीच्या माळावर येऊन त्यांना लाल दिव्याच्या गाडीसह सहकार परिषदेचे अध्यक्षपद बहाल केले होते.
आपल्या परंपरागत विरोधकांबरोबर अनेकदा देसाईंनी कडवी झुंज दिली. पण सन २००४ ला त्यांना पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत यश मिळाले. ५ वर्षांपूर्वी राज्यात शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी सोबत सत्तेत आली आणि देसाई गृहराज्यमंत्री झाले. अडीच वर्षांपूर्वी पुन्हा राज्यात नाट्यमय घडामोडी घडल्या. सत्तांतर झाले त्यात देसाईंना कॅबिनेट मंत्रीपदासह सातारचे पालकमंत्रीपद मिळाले. या दरम्यान त्यांनी कोट्यावधी रुपयांची विकास कामे मतदार संघात केली. त्यामुळे देसाईंची मतदारसंघावर पकड मजबूत झाल्याचे बोलले जात होते.
पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दस्तूरखुद्द पालकमंत्र्यांच्या मतदार संघात महायुतीचा उमेदवार पिछाडीवर राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले. सहाजिकच त्यामुळे देसाईंवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. तर त्यांचे शिवसेनेतील विरोधक हर्षद कदम यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावला आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेनेने विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून सध्या मुंबईत जोर बैठका सुरू दिसत आहेत.
मुंबईत बैठक कशासाठी?पाटण तालुका हा दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे तेथील बरेच लोक मुंबईला उपजीविकासाठी वास्तव्यास आहेत. परिणामी पाटण विधानसभा मतदारसंघातील सुमारे ६५ हजार मतदार हा मुंबईत आहे. त्यांच्यापर्यंत आपली भूमिका पोहोचली पाहिजे या हेतूने दोन्ही शिवसेनेकडून या मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे.
ठाकरे काय म्हणाले ?शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा ३० जून रोजी मुंबईत पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा मेळावा झाला. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पाटण मतदार संघातून झालेले मतदान बोलके असल्याचे सांगितले. तर पाटण विधानसभा मतदारसंघातून नवा आमदार आपलाच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .पण त्याचवेळी उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंचा असल्याचे सांगत उमेदवाराचे नाव मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवणेच पसंद केले.
लोकसभा निवडणुकीत 'आघाडी'!नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाटण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराने आघाडी घेतली. विद्यमान आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेले मताधिक्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या दृष्टीने जमेची बाजू मानली जात आहे.
आता रविवारच्या मेळाव्याकडे लक्षशिवसेना शिंदे गटाचा पाटणवासीय मतदारांचा मेळावा रविवारी मुंबईतच होत आहे. या मेळाव्याला पालकमंत्री शंभूराज देसाई हे मार्गदर्शन करणार आहेत. आता विरोधकांचा झालेला मेळावा ,त्यात वक्त्यांनी केलेली भाषणे, याला मंत्री देसाई नेमके काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आघाडीत मतदारसंघ कोणाला ?पाटण विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीतून मंत्री देसाई यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. पण महाविकास आघाडीत कोणाला उमेदवारी मिळणार ?याबाबत मतदार संघात उलट सुलट चर्चा आहेत. वास्तविक येथे शिवसेनेचे विद्यमान आमदार असलेने शिवसेना उद्धव ठाकरे ही जागा आपल्याकडेच ठेवणार असे वाटत आहे. मुंबईत आदित्य ठाकरेंनी तसे संकेत दिले आहेत. पण येथे शरद पवार राष्ट्रवादीही उमेदवारीसाठी आग्रही राहणार आहे हे नक्की! त्यामुळे उमेदवारी नेमकी कोणत्या पक्षाला अन उमेदवार नक्की कोण? याबाबत चर्चा सुरू आहेत.