वरकुटे -मलवडी : वरकुटे-मलवडी येथे मारुती मंदिरात आयोजित केलेल्या ग्रामसभेत पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरत पाणी टंचाईवर खडे बोल सुनावले.?
गेली तीन महिने वरकुटे मलवडी परिसरात भीषण पाणीटंचाई असताना गांवकºयांच्या पिण्याच्या पाण्याबद्दलच्या अडचणी शासन दरबारी मांडून त्यावर उपाययोजना करायला पाहिजे होत्या; परंतु प्यायला पाणी नाही, या कारणामुळे सर्वसामान्य जनतेची चाललेली तडफड उघड्या डोळ्यांनी पाहून सुद्धा आंधळं आणि ऐकून बहिरं होण्यामागची ग्रामपंचायतीची काय कारणे आहेत. याबद्दल उपस्थित सर्वच ग्रामस्थांनी अधिकारी आणि ग्रामपंचायतीच्या कारभाºयांना धारेवर धरले. येत्या चार ते पाच दिवसांत पिण्याचे पाणी ग्रामपंचायतीने उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा तरूणांनी दिला आहे.
यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्या सुवर्णाताई देसाई, उपसरपंच बापूसाहेब बनसोडे, माजी पंचायत समिती सभापती वसंतराव जगताप, विजय बनसोडे, बाळकृष्ण जगताप, रामचंद्र नरळे, जालिंदर खरात, जयसिंग नरळे, माणिकराव जगताप, सतीश जगताप, बंडोपंत मंडले, सुनील थोरात, बाबासाहेब नरळे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
मागासवर्गीयांच्यासाठी असणाºया स्मशानभूमीला कित्तेक वर्षे रस्ता नसल्याने ऐनवेळी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने त्वरित रस्त्याची सोय करावी, असा ठराव मंजूर करण्यात आला. बाळासाहेब आटपाडकर यांनी गावात दारू बंदी करावी, असा ठराव मांडला मात्र काहींनी गावची दारू बंद झाली तर आम्ही कुठे जायचं असे म्हणून खिल्ली उडवली.
याबरोबरच गावात कायमस्वरूपी वायरमन, आरोग्य उपकेंद्र ,दलित वस्तीतील गटारे सांडपाणी, आणि दीड वर्षांपासून विजेच्या खांबावरील बंद असलेले पथदिवे त्वरित सुरु करण्याबाबत ग्रामसभेत आवाज उठवला. तसेच दररोज ग्रामसेवक, तलाठी यांनी गावात दप्तरी काम करण्यासाठी उपस्थित राहण्याबाबत आग्रह धरला. तसेच पंधरा टक्के मागासवर्गीय निधी दोन वर्षे होवून गेली तरी त्याचा अद्याप लाभ मिळाला नसल्याने त्वरित लाभ देण्यात यावा अन्यथा वरिष्ठांच्याकडे तक्रार देण्यात येईल असे ठणकावून सांगण्यात आले.यावेळी सुभाष जगताप, साहेबराव खरात, प्रदिप पन्हाळे, राहूल सुर्यवंशी, सुरेश यादव,अमोल यादव,नामदेव शिंदे,चंद्रकांत पिसे, संजय काटकर,धोंडीराम तोडकर, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...तर हंडामोर्चा काढू : सुरेखा काळेल
ग्रामसभेत प्रथमत:च सुरेखा काळेल या महिला भगिनीने ग्रामविकास अधिकारी आय.ए.शेख यांना पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे, आणि गटाराचे सांडपाणी साचून आमच्यासह आजूबाजूच्या अनेक लोकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. याबाबत आपणाकडे अनेकवेळा तक्रारी देवून सुद्धा आपण कसलीच कारवाई केलीच नाही, परंतु पाच ते सहा दिवसांमध्ये आमच्या समस्यांचे निवारण न केल्यास सर्व गावातील महिलांसह ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर महिलांचा हंडामोर्चा काढला जाईल, असे ठणकावून सांगितले.