सातारा : कोरोनामुळे शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सभा व्हीसीद्वारे सुरू आहेत. मात्र, प्रश्नांची सोडवणूक होत नाही व विषय अर्धवट राहत असल्याने सर्वसाधारण सभातरी झेडपीतच घेण्यासाठी सदस्य आता आक्रमक झाले आहेत. बाजार सुरू झाले, शाळांची घंटा वाजली, मंदिरे उघडली. मग, कमी संख्या असणारी सभाच झेडपीत का नको असा सवालही सदस्य करु लागले आहेत.याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. गावे, शहरांबरोबरच खेडोपाडीही बाधित सापडू लागले आहेत. तसेच शासकीय कार्यालयातही कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. अशीच स्थिती राज्यभरात आहे. त्यामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या सर्वच सभा या व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घेण्याचा निर्णय घेतला. तसा पत्रव्यवहार सर्वच जिल्हा परिषदांना करण्यात आला होता. यामुळे शासनाचे हे बंधन सर्वांवरच आले. परिणामी जिल्हा परिषदेच्या सर्वच सभा, बैठका या व्हीडिओ कॉन्फरसिंगद्वारे होत आहेत.सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांची मासिक सभा, स्थायी समिती सभा या ह्यव्हीसीह्णद्वारेच होत आहेत. तसेच आतापर्यंत झालेल्या दोन सर्वसाधारण सभा याही व्हीसीद्वारेच घेण्यात आल्या. त्यातच आता पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर सर्वसाधारण सभेचा घाट घालण्यात आला आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही सभा होऊ शकते. त्यामुळे बहुतांशी सदस्यांनी सर्वसाधारण सभा सभागृहातच घ्या, म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे.सर्वसाधारण सभा ह्यव्हीसीह्णद्वारे घेताना टेक्निकल अडचणी निर्माण होतात. तसेच विषयांत सुसूत्रता राहत नाही. सभापटलावर येणारा विषय पूर्ण न होता, अर्धवट राहतो. प्रत्येकजण आपापले विषय पुढे आणत असतो. यामुळे प्रश्नांची आणि विषयांची सोडवणूक होत नाही. त्यामुळे विकासकामांवर परिणाम झाल्याचे सदस्यांतून सांगण्यात येत आहे. एकंदरीतच व्हीसीद्वारे सर्वसाधारण सभा घेण्यास बहुतांशी सदस्यांचा विरोध आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत होणारी सर्वसाधारण सभा प्रशासन कोणत्या पध्दतीने घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.बाजारात शेकडोजण, सभेला ९०...जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला ६४ सदस्य, संबंधित तालुक्यांचे पंचायत समिती सभापती आणि काही अधिकारी उपस्थित असतात. साधारणपणे ९० ते १०० पर्यंत उपस्थितांची संख्या राहते. त्यामुळे गर्दीचा विषय फारसा येत नाही. त्यातच सोशल डिस्टन्स ठेवायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाऐवजी यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात सर्वसाधारण सभा घ्या. त्यामुळे गर्दी होण्याचा विषयच होत नाही, असा सूर सदस्यांनी लावला आहे. तर दुसरीकडे बाजार सुरू करुन गर्दी होते, शेकडोजण येतात, झेडपीची ९० जणांत होणारी सभाच का समोरासमोर नको, असे सदस्य म्हणू लागले आहेत.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा व्हीसीद्वारे न घेता सभागृहात घेण्याची मागणी जवळपास सर्वच सदस्यांची आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. प्रशासनानेही शासनाला पत्रव्यवहार केला आहे. लवकरच निर्णय अपेक्षित आहे.- उदय कबुले, अध्यक्ष जिल्हा परिषद