कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. सहकार पॅनेलची विजयाची घोडदौड पाहिली की विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या चेहऱ्याला सभासदांनी पुन्हा पसंती दिल्याचे स्पष्ट होते. हा निकाल विरोधकांना नक्कीच आत्मचिंतन करायला लावणारा ठरणार आहे.
कारखान्याची निवडणूक कोरोना महामारी संकटामुळे वर्षभर पुढे ढकलली होती. मात्र काही सभासदांनी निवडणूक त्वरित घ्या म्हणून थेट न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार ही निवडणूक झाली. २९ जून रोजी यासाठी मतदान झाले, तर गुरुवार, दि. १ जुलै रोजी मतमोजणी झाली.
निवडणुकीत सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनलच्या विरोधात डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत पॅनल, तर अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल रिंगणात उतरले होते. तिन्ही पॅनलनी वर्षभरापासून या निवडणुकीची तयारी चालवली होती. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सत्ताधारी डॉ. भोसले यांना थांबविण्यासाठी विरोधी दोन पॅनलच्या एकत्रीकरणचाही प्रयत्न झाला. मात्र त्याला यश आले नाही.
तिरंगी लढत स्पष्ट झाल्यावर विरोधी डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या प्रचारासाठी स्वतः सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम मैदानात उतरले होते, तर अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनलच्या प्रचारात काँग्रेसचे नेते ॲड. उदयसिंह पाटील सक्रिय होते. प्रचाराचा धुरळा उडाला होता. परिणामी निवडणुकीत कोण बाजी मारणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मतमोजणीनंतर ही उत्सुकता संपली असून, सहकार पॅनेलला मिळालेले यश कौतुकास्पद ठरले आहे.
सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा अनुसूचित जाती जमाती गटात पहिल्या फेरीत सुमारे साडेपाच हजाराचे मताधिक्य सहकार पॅनलला मिळाल्याचे दिसले. त्याचवेळी मतदारांचा कौल समजला. त्यानंतर भटक्या विमुक्त जमाती, इतर मागास प्रवर्ग, महिला राखीव गट व खुल्या गटांची पहिली फेरी झाली. त्यात तेच मताधिक्य सर्वसाधारणपणे राहिल्याचे दिसले. दुसरी फेरी सुरू झाली त्यातही पहिल्या फेरीप्रमाणेच मतदारांचा कौल दिसला. त्यामुळे मतदारांनी डॉ. सुरेश भोसले यांच्या गत सहा वर्षांतील कामाची पोहोचपावती त्यांना दिली असेच म्हणावे लागेल.
या निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले, मदनराव मोहिते. डॉ.इंद्रजित मोहिते, अविनाश मोहिते या पॅनल प्रमुखांबरोबरच सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम व कराड दक्षिण काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र सभासदांनी सहकार पॅनलला दिलेली पसंती ही विरोधकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरणार आहे.
चौकट
राजकीय रंग देण्याचा प्रयत्न असफल
डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले हे भाजपवाशी असल्याने कृष्णाच्या निवडणुकीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरुवातीला झाला. विरोधी पॅनलच्या काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न झाला. पण सुरुवातीपासूनच डॉ. सुरेश भोसले यांनी ही सहकारी संस्थेची निवडणूक आहे येथे पक्षीय राजकारण नाही, अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय रंग देण्याचा विरोधकांचा प्रयत्न असफल झाल्याचे दिसते.