सातारा : जिल्ह्यात गत दोन महिन्यांपासून लसीकरण सुरू झाले आहे. या लसीकरणाला सर्वाधिक पुरुष प्राधान्य देत आहेत. मात्र, महिलांचे प्रमाण कमी असल्याचे समोर आले आहे. याची कारणे अनेक असली तरी काही महिलांना रांगेत उभे राहण्यास नको तर काही महिलांना घरकामातून वेळ मिळत नाही. त्यामुळे अनेक महिला लसीकरण करण्यास टाळाटाळ करत असल्याचे सांगितले जात आहे.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर लसीकरणाचे महत्त्व सर्वांनाच पटले. पहिल्या लाटेवेळी अनेकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली. मात्र, दुसऱ्या लाटेची भीषणता पाहूनच अनेकांनी लसीकरण केंद्रावर रांगा लावण्यास सुरुवात केली. यामध्ये सर्वाधिक आघाडीवर राहिले ते पुरुष. पहाटे तीन वाजता पुरुष लसीकरण केंद्रावर रांग लावत होते. त्यामुळे पुरुषांनी लसीकरण करून घेतले. त्या तुलनेत महिला मागे राहिल्या. महिलांचाही लसीकरण करण्यावर भर आहे. मात्र, घरातील कामातून वेळ मिळत नसल्याने अनेक महिला आज लसीकरणाला जाऊ, उद्या जाऊ, असे करत आहेत. त्यातच अधूनमधून जिल्ह्यात लसीचा होणारा तुटवडा हे सुद्धा एक मुख्य कारण आहे. सकाळी घरातून लवकर आवरून लसीकरण केंद्रावर रांग लावणे महिलांना शक्य होत नसते. घरातील कामे व स्वयंपाक हा महिलांना करावा लागतो. लसीकरण केंद्रावर एका व्यक्तीचा नंबर स्वतः लसीकरण करण्यास गेलेला व्यक्तीच लावू शकतो. त्यामुळे महिलांचे प्रमाण लसीकरणामध्ये कमी आहे. त्यातच मे महिन्यामध्ये रखरखते ऊन होते. या उन्हाच्या तडाख्यात महिला घरातून बाहेर पडल्या नाहीत. अनेक महिलांच्या घरापासून लसीकरण केंद्र दूरवर आहेत. त्यामुळेही त्या केंद्रापर्यंत जाण्यासाठी अनेकांना वाहनाची सोय नव्हती. रिक्षाचे भाडेही भरमसाठ सांगत असल्यामुळे अनेक महिलांनी लसीकरण केंद्रावर जाणे टाळले. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर बस सुरू होतील व त्यानंतर आपण लसीकरण केंद्रावर जाऊ, असेही अनेक महिलांनी ठरवले आहे.
त्याचबरोबर आरोग्य विभागाने पुरुष आणि स्त्री यांचे नेमके किती लसीकरण झाले आहे, याचे वर्गीकरण केले नाही. त्यामुळे या विभागाकडे नेमकी आकडेवारीही उपलब्ध नाही. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीतून महिलांपेक्षा लसीकरण करण्यात पुरुष पुढे असल्याचे पाहायला मिळत आहे.
कोट : कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे हृदयात धडकी भरत आहे. अनेकांचा जीव गेला आहे. हे पाहून मन कासावीस होते. लसीकरण केल्यानंतर कमीत कमी मृत्यू तरी होत नाही, हे शासनाने सांगितले आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कुटुंबातील सर्वांनीच लसीकरण केले आहे.
योगिनी जाधव, सातारा
कोट: लसीकरणासाठी आम्ही बराच प्रयत्न केला मात्र वारंवार लस संपली आहे, असे सांगण्यात येत आहे. एकदा तर आम्ही सकाळी सहा वाजता लसीकरण केंद्रावर जाऊन रांग लावली होती. मात्र, दोन तास उभे राहिल्यानंतर आम्हाला लस संपली असल्याचे सांगण्यात आले. त्या दिवसापासून आम्ही लसीकरण केंद्राकडे फिरकलो नाही.
सत्वशीला माने, यादोगोपाळ पेठ, सातारा
कोट : सध्याच्या स्थितीला लसीकरण अत्यंत गरजेचे आहे. लसीकरणामुळे आपल्या शरिरातील प्रतिकारशक्ती वाढत आहे. कोरोना काय इतर आजारही या लसीमुळे होणार नाहीत. त्यामुळे मी लस घेतली आहे.
संजना देशमुख, विसावा नाका, सातारा