लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : वर्षभरातील परीक्षांचे गुण आणि विविध उपक्रमांतील सहभागाचे मूल्यमापन करून पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा झाल्यानंतर प्रगतीपत्रक दिले जाते. मात्र, कोरोनामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रगतीपत्रावर ‘वर्गोन्नत’ असा शेरा दिला जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पहिली ते चौथीचे वर्ग प्रत्यक्षात भरले नाहीत. ज्या विद्यार्थ्यांना नेटवर्क, स्मार्टफोन उपलब्धतेची अडचण होती, त्याठिकाणी पालकांच्या संमतीने ऑफलाईन वर्ग सुरू होते. मात्र, त्यात पहिली, दुसरीचे विद्यार्थी नव्हते. चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरले नसल्याने शाळेत कोणतेही उपक्रम राबविण्यात आले नाहीत. वार्षिक परीक्षाही रद्द झाली. तोंडी, लेखी परीक्षाही झाली नसल्याने या विद्यार्थ्यांचे आकारिक अथवा संकलित मूल्यमापन करता आले नाही. त्यामुळे शाळांना पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे प्रगतीपत्रक तयार करताना त्यावर ‘वर्गोन्नत’ या शेऱ्याचा उल्लेख करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या. त्यानुसार शाळांमध्ये कार्यवाही करण्यात येत आहे. शाळांमध्ये या आठवड्यात प्रगतीपत्रके ऑनलाईन स्वरूपात वितरीत केली जाणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांनी दि. १ मे रोजी प्रगतीपत्रके ऑनलाईन दिली आहेत.
चौकट
प्रगतीपत्रकच बदलणार
शाळेत सहामाही, वार्षिक परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे गुणपत्रक हे आकारिक, संकलित मूल्यमापनानंतर तयार केले जाते. त्यात विषयनिहाय गुण आणि मिळालेल्या श्रेणीचा उल्लेख असतो. त्यासह मुलांचे वजन, उंची, शाळेतील महिनानिहाय उपस्थितीच्या दिवसांची संख्या यांचा उल्लेख असतो. पण, कोरोनामुळे यंदा विद्यार्थी हे शाळेतच आलेले नाहीत. त्यामुळे त्यांची उंची, वजन घेतलेले नाही. ऑनलाईन उपस्थिती असली, तरी त्याचा उल्लेख प्रगतीपत्रकावर असणार नाही. विषयनिहाय प्राप्त गुणांनुसार श्रेणी दिली जात असली, तरी यंदा त्याऐवजी ‘वर्गोन्नत’ असा उल्लेख असणार आहे.
विद्यार्थी संख्या दृष्टिक्षेपात
पहिलीतील विद्यार्थी :
दुसरीतील विद्यार्थी :
तिसरीतील विद्यार्थी :
चौथीतील विद्यार्थी :
प्रतिक्रिया
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या निर्देशांनुसार पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे प्रगतीपत्रक तयार करण्याची कार्यवाही शाळांमध्ये सुरू आहे. यावर्षी त्यांच्या प्रगतीपत्रकावर ‘वर्गोन्नत’ असा उल्लेख असणार आहे. या विद्यार्थ्यांचे प्रगतीपत्रक त्यांच्या पालकांच्या व्हॉट्सअॅप अथवा ई-मेलवर पाठविण्यात येईल.
- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी
मुले घरात कंटाळली
ऑनलाईन शिक्षण घेताना काही प्रॉब्लेम आल्यानंतर कंटाळा येतो. शाळेत जावून शिक्षण घेण्यात खूप चांगले वाटते. घरी असताना आजूबाजूचा दंगा असतो. त्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही. डोळे दुखतात, त्यामुळे लवकर शाळा पुन्हा सुरू व्हावी.
- विनया जाधव, इयत्ता चौथी
प्रवेश घेताना शाळेत गेले होते. त्यानंतर पुन्हा जात आले नाही. आई-बाबांच्या मोबाईलवरच अभ्यास केला. आता पुढच्या वर्गात गेले आहे. यावर्षी तरी शाळा सुरू व्हाव्यात, असे वाटते.
- अन्वी जाधव, इयत्ता पहिली
कोटला फोटो आहेत
..............................