सातारा : लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसायांना फटका बसल्याने लॉकडाऊन हटविण्याची मागणी होत होती. तेव्हा गर्दी न करणे, सॅनिटायझर, मास्क वापरण्याबाबत नियम लादून दुकाने उघडण्यास परवानी दिली. सुरुवातीला याचे पालन झाले. आता गर्दी वाढत असताना साताऱ्यातील कापड व्यावसायिकांनी सॅनिटायझर ठेवणे बंद केले आहे.
०००००००००
शहरातील गतिरोधक धोकादायक
सातारा : साताऱ्यातील गल्लीबोळात उतारावरून दुचाकी वाहने सुसाट धावत असतात. त्यामुळे लहान मुलांना अपघाताचा धोका असल्याने अनेक ठिकाणी रस्ते खोदून गतिरोधक तयार केले आहे. किंवा काही ठिकाणी मोठे उंचवटे तयार केले आहेत. या अशास्त्रीय गतिरोधकांमुळे वाहनांचे नुकसान होत आहे. तसेच अपघातांचा धोका वाढला आहे. अपघातांना निमंत्रण देणाऱ्या गतिरोधकांचा शोध घेऊन ते हटवावेत व त्या ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने गतिरोधक तयार करावेत, अशी मागणी वाहनचालकांमधून केली जात आहे.
०००००००
कचऱ्याच्या ढिगाने प्रवाशांना त्रास
नागठाणे : पुणे-बंगलोर महामार्गावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे नागरिक व प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. अस्वच्छतेमुळे साथीचे रोग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संबंधित प्रशासनाने या घाणीकडे तातडीने लक्ष देऊन त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व पर्यटकांकडून होत आहे. पुण्यापासून सुरू होणारा राष्ट्रीय महामार्ग चकाचक आहे. मात्र जिल्ह्यात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साठलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पर्यावरणाला धोका पोहोचत असून रोगराईलाही एक प्रकारे निमंत्रण देण्याचेच काम होत आहे.