महाबळेश्वर : सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचे तापमान हळूहळू खालावू लागले आहे. गेल्या काही दिवसापासून पावसासह थंडी वाढ झाल्याने नागरिकांना हुडहुडी भरत आहे. हवामान विभागाने सोमवारी महाबळेश्वरचे कमाल तापमान २३ तर किमान तापमान १७.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे.
बाजारपेठेत गर्दी
सातारा : अत्यावश्यक सेवा सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. संचारबंदीचे निर्बंध शिथिल झाल्याने सातारा शहरात नागरिकांची खरेदीसाठी अक्षरश: झुंबड उडत आहे. नागरिकांकडून फिजिकल डिस्टन्सचे पालन केले जात नसल्याने, कोरोना संक्रमणाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
फांद्या हटविल्या
सातारा : पावसाळा सुरू झाल्याने वीजवाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या धोकादायक फांद्या हटविण्याचे काम वीज वितरण कंपनीकडून हाती घेण्यात आले आहे. या फांद्या वाहनधारक तसेच पादचाऱ्यांच्या अंगावर पडण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात होती. त्यामुळे वीज वितरण कंपनीने धोकादायक फांद्या हटविण्याचे काम हाती घेतले आहे.
रस्ता दुरुस्तीची मागणी
सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणे धोक्याचे ठरू लागले आहे. बांधकाम विभागाकडून किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, हे काम अर्धवट आहे. त्यामुळे उर्वरित कामही तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
घाणीचे साम्राज्य
सातारा : संचारबंदीमुळे शहरातील मंडई बंद असल्या तरी येथील महात्मा फुले भाजी मंडई व मार्केट यार्ड परिसरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पावसामुळे वाहत आलेल्या कचऱ्याचेही सर्वत्र ढीग साचले आहे. घाण व दुर्गंधीमुळे नागरिकांचा याचा त्रास सहन करावा लागत आहे. या परिसराची तातडीने स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
रिफ्लेक्टरची मागणी
शेंद्रे : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होत आहे. रिफ्लेक्टर नसल्यामुळे महामार्गावर लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. प्रामुख्याने वाढे फाटा ते लिंबखिंड या परिसरात दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टरचा अभाव जाणवत आहे.
व्हॉल्व्हला गळती
सातारा : शहरातील बुधवार नाका चौकात असलेल्या एका व्हॉल्व्हला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. सायंकाळी या पेठेला पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर या व्हॉल्व्हमधून सातत्याने पाणी वाहत असते. एकीकडे पालिका पाणीबचतीचे आवाहन करीत आहे तर दुसरीकडे पाणी वाया जात असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्लास्टिकचा वापर
सातारा : सातारा पालिकेने कारवाई करूनही शहरातील हातगाडीधारकांकडून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. शहरातील राजवाडा, खणआळी, मोती चौक, देवी चौक, पाचशे एक पाटी, जुना मोटर स्टॅन्ड परिसरातील अनेक हातगाडीधारक प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू लागले आहेत. पालिकेची दंडात्मक मोहीम थंडावल्याने परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे.